पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – बारामती लोकसभा मतदार संघात एकूण २ हजार ५१६ मतदान केंद्र असून त्यासाठी आवश्यक ९ हजार ५८ बॅलेट युनिट, ३ हजार ५६९ कंट्रोल युनिट आणि ३ हजार ८२५ व्हीव्हीपॅट यंत्रांची सरमिसळ संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून करण्यात आली.
निवडणूक निरीक्षक आनंदी पालानीस्वामी यांच्या उपस्थितीत विधानभवन येथील सभागृहात संगणकीय पद्धतीने मतदान केंद्रनिहाय द्वितीय सरमिसळ (रँडमायझेशन) प्रक्रिया पार पडली.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी, समन्वयक अधिकारी हनुमंत आरगुंडे, समिक्षा चंद्राकर, ईव्हीएम व्यवस्थापन समन्वयक अधिकारी रुपाली आवले, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर, सहायक समन्वयक अधिकारी विजय मुळीक, सुप्रिया डांगे, उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
बारामती लोकसभा संघात ३८ उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याने आणि नोटाचा पर्याय लक्षात घेता या मतदार संघातील प्रत्येक मतदान केंद्रावर प्रत्येकी तीन बॅलेट युनिटची आवश्यकता भासणार आहे. त्यानुसार दि. २३ एप्रिल रोजी परवणी सरमिसळ प्रक्रियेद्वोर आवश्यक बॅलेट युनिट वितरीत करण्यात आले आहेत.
यंत्रणा पोलीस बंदोबस्तात
या यंत्रांपैकी सर्व विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्राच्या १२० टक्के बॅलेट आणि १४१ टक्के कंट्रोल युनिट, तर १५२ टक्के व्हीव्हीपॅट यंत्र देण्यात येणार आहेत. तत्पूर्वी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना सरमिसळ प्रक्रियेची माहिती देण्यात आली. वितरणानंतर ही यंत्रे संबंधित विधानसभा मतदारसंघाच्या स्ट्राँग रूममध्ये पोलीस बंदोबस्तात ठेवण्यात येणार आहे.