पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – लष्कर परिसरात एका आलिशान कारच्या चालकाला फिट आल्याने कारने तब्बल दहा दुचाकींना ठोकरले. यामध्ये एक तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सुदैवाने इतर कोणतीही मनुष्यहानी झाली नाही. हा थरार भरदुपारी फॅशन रोड, जाफरीन लेक लष्कर येथे घडला. याप्रकरणाची नोंद करण्याचे काम लष्कर पोलीस ठाण्यात सुरु आहे.
पोलिसांनी सांगितलेली माहिती अशी की, अंकीत छाजेड नावाच्या व्यक्तीची मर्सिडीज कार आहे. त्यावर रविंद्र धनवटे (वय ३२,रा. अहमदनगर) हा चालक म्हणून काम करतो. तो छाजेड यांच्या मुलीला डांन्सच्या क्लासला पोहचवून पुन्हा घरी परतत होता.
यावेळी त्याला गाडीतच. फिट आली. यामुळे गाडी तशीच सरळ पार्क केलेल्या वाहनांना धडकत पुढे गेली. गाडीने तब्बल दहा वाहनांना धडक दिली. यानंतर गाडी थांबली. यामध्ये अतिक शौकतअली खत्री (वय २९,रा. इंदौर) हा तरुण गंभीर जखमी झाला, त्याला नागरिकांनी तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले.
तर, गाडीत फिट येऊन पडलेल्या धनवटे याला बाहेर काढून पाण्याचा मारा करत शुद्धीवर आणले. सुदैवाने गल्ली अरुंद असल्याने तसेच दुचाकीकडेला पार्क केलेल्या असल्याने कार इतर नागरिकांच्या अंगावर गेली नाही. घटनेची माहिती मिळताच लष्कर पोलीस ठाण्याचे कर्मचारी दाखल झाले, त्यांनी नागरिकांच्या मदतीने वाहने बाजूला उचलून ठेवली. गाडी मालकाशी पोलिसांनी संपर्क साधून घडलेल्या अपघाताची माहिती दिली.