पिंपरी, (प्रतिनिधी) – पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या (पीजीसीआयएल) तळेगाव अतिउच्चदाब 400 केव्ही उपकेंद्रात बिघाड झाल्यामुळे शुक्रवारी (दि.26) पिंपरी, चिंचवड, पिंपळे सौदागर, रहाटणी, वाकड, चाकण, तळेगाव, वडगाव, कामशेत, मरकळ, आकुर्डी या परिसरातील सुमारे 1 लाख 32 हजार 900 ग्राहकांचा वीजपुरवठा दुपारी 1.49 ते 3.30 या कालावधीत खंडित झाला होता.
याबाबत माहिती अशी की, तळेगाव येथील ‘पीजीसीआयएल’च्या अतिउच्चदाब 400 केव्ही उपकेंद्रात आज दुपारी पावणे दोनच्या सुमारास बिघाड झाला. त्यामुळे महापारेषणच्या 220 केव्ही काठापूर, 132 केव्ही सणसवाडी, 132 केव्ही मरकळ, 220 केव्ही थेऊर, 132 केव्ही यवत, 132 केव्ही रहाटणी, 220 केव्ही उर्से, 220 केव्ही चिंचवड या अतिउच्चदाबाच्या उपकेंद्रांचा वीजपुरवठा बंद पडला.
परिणामी महावितरणच्या 18 उपकेंद्रांचा वीजपुरवठा देखील खंडित झाला. अतिउच्चदाबाच्या आठ उपकेंद्रांचा वीजपुरवठा बंद पडल्याने तब्बल 523 मेगावॅट विजेची पारेषण तूट निर्माण झाली. त्यामुळे पारेषण यंत्रणेतील संभाव्य धोके व बिघाड टाळण्यासाठी स्वयंचलित भारव्यवस्थापन यंत्रणा म्हणजेच ‘एलटीएस’ यंत्रणा कार्यान्वित झाली.
त्यामुळे पिंपरी गाव, चिंचवड, पुनावळे, वाल्हेकरवाडी, रहाटणी, पिंपळे सौदागर, वाकड, ताथवडे, किवळे, रावेत, थेरगाव, सांगवी, आकुर्डी परिसर तसेच चाकण, कुरळी, नाणेकरवाडी, निघोजे, शेल पिंपळगाव, धावडी, तळेगाव, वडगाव, कामशेत शहर व परिसरातील सुमारे 1 लाख 32 हजार 900 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला.
त्यानंतर ‘पीजीसीआयएल’च्या अधिकार्यांनी युद्धपातळीवर तांत्रिक उपाययोजना करून दीड तासांत पर्यायी स्वरुपात वीजपुरवठा उपलब्ध करून दिला व महापारेषणच्या अतिउच्चदाबाच्या व त्यानंतर महावितरणच्या उपकेंद्रांचा खंडित झालेला वीजपुरवठा टप्प्याटप्प्याने पूर्ववत झाला.
‘पीजीसीआयएल’च्या तळेगाव 400 केव्ही उपकेंद्रातील बिघाड दुरूस्तीचे काम युद्धपातळीवर सुरु असून महापारेषण कंपनीचे पुणे येथील एक पथक याकामी सहकार्य करीत आहे. आज रात्री उशिरापर्यंत उपकेंद्रातील दुरुस्तीचे काम पूर्ण होणार असल्याची माहिती देण्यात आली.