संगमनेर -कीर्तनकार तथा समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांच्यासंबंधी संगमनेरच्या सत्र न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यात नवीन सरकारी वकील म्हणून अरविंद राठोड यांची नियुक्ती झाली आहे. या खटल्याची सुनावणी 8 डिसेंबरला होणार होती. कोर्ट रजेवर असल्याने सदर सुनावणी झाली नसल्याने बुधवारी (दि. 9) सुनावणी झाली असून, 16 डिसेंबर ही पुढील तारीख देण्यात आलेली आहे.
सरकारी वकिलांनी खटल्याच्या संदर्भात कोर्टात दाखल केलेली कागदपत्रे अपिलाच्या कामी बोलाविण्यात यावेत, असा कोर्टाने हुकूम केला असून, इंदुरीकर महाराजांच्या वकिलांनी प्रमाणित कागदपत्रे जिल्हा न्यायालयात दाखल करावे, असा आदेश काढण्यात आला.
सरकारी वकील म्हणून अरविंद राठोड या खटल्याची तपासणी करणार आहेत. कीर्तनातून पीसीपीएनडी कायद्याचा भंग केल्याप्रकरणी इंदुरीकरांविरुद्ध संगमनेरच्या कनिष्ठ न्यायालयात आरोग्य विभागातर्फे खटला दाखल करण्यात आला होता. इंदुरीकरांतर्फे ऍड. के. डी. धुमाळ, बाजू मांडत आहेत.