तृप्ती देसाईंना शिर्डीत नो एन्ट्री

कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होण्याच्या शक्‍यतेने पोलिसांनी बजावली नोटीस

शिर्डी -आंतराष्ट्रीय तीर्थक्षेत्र शिर्डी सध्या भाविकांच्या ड्रेसकोडमुळे चर्चेत आहे. साई संस्थानने मंदिर परसरात भाविकांना भारतीय संस्कृतीनुसार पोशाख परिधान करण्याच्या विनंतीचे फलक लावले आहेत. त्यामुळे भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी सदर फलकांवर आक्षेप घेत थेट शिर्डीत येऊन तो फलक काढण्याचा इशारा दिला आहे. त्यानंतर शिर्डीतील विविध सामाजिक संस्थांनी त्यावर तीव्र आक्षेप घेतल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होण्याची शक्‍यता लक्षात घेता, पोलिसांनी देसाई यांना शिर्डीत येण्यास मज्जाव केला आहे. तशी नोटीसही त्यांना दिली आहे.

शिर्डी संस्थानने काही भाविकांनी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी ड्रेसकोड ठेवण्याची विनंती केली होती. त्याची दखल घेत शिर्डी संस्थाने मंदिर परिसरात भाविकांनी भारतीय पोशाखात दर्शनासाठी येण्याचे आवाहन करणारे फलक लावले आहेत. त्याला आक्षेप घेत 10 डिसेंबर रोजी शिर्डीत येवून आपण हे फलक हटविणार, अशी भूमिका तृप्ती देसाई यांनी घेतली. त्यानंतर भाविकांत व शिर्डीतील नागरिकांत संताप निर्माण झाला. त्यामुळे शिर्डीतील अनेक सामाजिक संस्थांनी तृप्ती देसाई यांचा निषेध केला.

तसेच शिवसेना महिला आघाडीने तर प्रतिआव्हान देत देसाई शिर्डीत आल्या व स्टंटबाजी केली, तर त्यांच्या तोंडाला काळे फासणार, अशी भूमिका जाहीर केली. एका धार्मिक ठिकाणी भाविकांच्या भावनेच राजकारण आणि स्टंट होत असेल, तर ते कदापिही सहन केले जाणार नाही, अशी भूमिका अखिल भारतीय ब्राह्मण समाज संघटनेने घेतली.

त्यानंतरही देसाई 10 डिसेंबरला शिर्डीत येवून फलक काढणारच, या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था लक्षात घेवून शिर्डीचे पोलीस उपविभागीय अधिकारी संजय सातव यांनी मंगळवारी देसाई यांच्या पुणे येथील घरी जावून महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या मार्फत त्यांना नोटीस बजावत तुम्हाला शिर्डीत येण्यास कायदेशीर मज्जाव आहे, असे कळविले.त्यावर देसाई यांनी हा लोकशाहीचा अपमान आहे, असे म्हणत साई संस्थान व पोलीस प्रशासनावर ताशेरे ओढले.
यापूर्वीही देसाई यांनी शनिशिंगणापूर, मुंबई येथील हाजी अली दर्गा व अन्य धार्मिक स्थळांवर आंदोलने केली होती. मात्र शिर्डीतील श्रद्धा व सबुरीच्या दरबारात प्रथमच त्यांच्या आंदोलनाला ब्रेक मिळाला आहे, ही विशेष बाब म्हणावी लागेल. कारण साईबाबांच्या नागरीतून शांततेचा, सर्वधर्म समभावाचा संदेश जर संपूर्ण जगात जात असेल आणि त्याच ठिकाणी भारतीय संस्कृतीचे दर्शन पोशाखाने होत असेल, तर ही अभिमानाची बाब आहे. यातून एक सात्विक व धार्मिक वातावरण मंदिरात निर्माण होण्यास मदतच होत आहे, अशा प्रतिक्रिया अनेक भाविकांनी व्यक्त केल्या आहेत. त्यामुळे आता तरी देसाईंनी सबुरीच्या मार्गाने वागावे, असे आवाहन केले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.