उपमुख्यमंत्री अजित पवार : करोना परिस्थितीवर पोलीस आयुक्तालयात आढावा बैठक
पुणे – माणुसकी जपत करोना प्रतिबंधासाठी केलेल्या उत्तम कामांमुळे पुणे पोलीसांप्रती नागरिकांचा आदर वाढला आहे. सीमेवरील जवानांप्रमाणे पोलिसांच्या कामाचा राज्याला अभिमान आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे केले.
करोना नियंत्रणासाठी लॉकडाऊन कालावधीत पुणे पोलीस आयुक्तालयाच्या वतीने करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांबाबत उपमुख्यमंत्री पवार यांनी शुक्रवारी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संवाद साधून अडीअडचणी जाणून घेतल्या.
यावेळी पवार यांच्या हस्ते लॉकडाऊन कालावधीत चांगली कामगिरी केलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे कामगिरीचे बनविण्यात आलेले “फील द बिट’ पुस्तिकेचे पवार यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
यावेळी पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम म्हणाले, लॉकडाऊन कालावधीत सोशल पोलिसिंग, आऊटरिच, स्क्रीनिंग, कंटेन्मेंट झोन परिसरात कडक निर्बंध राबवण्याबरोबरच जनजागृती करण्यासाठी पोलीस शिपायांपासून ते वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी मनापासून काम केले आहे.
सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसव, अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग व स्थलांतरित मजुरांसाठीचे काम, अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांनी सोशल पोलिसिंग सेलबाबत, पोलीस उपायुक्त बच्चन सिंग यांनी प्रवासी पासबाबत, पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी सोशल मीडिया चित्रफिती बाबत व जनजागृती पुस्तिकांबद्दल, तर पोलीस उपायुक्त वीरेंद्र मिश्र यांनी पोलीस कल्याणकारी योजनांबाबत, तसेच पोलीस उपायुक्त मितेश घट्टे यांनी क्वारंटाइन व ड्रोनद्वारे नियंत्रणाबाबत तसेच अन्य परिमंडळ-1 ते 5 पोलीस उपयुक्तांनी त्यांच्या परिमंडळात राबवलेल्या उपक्रमांची माहिती दिली. या वेळी अपर पोलीस आयुक्त सुनील फुलारी व पोलीस उपायुक्त प्रसाद अक्कानवरू हे हजर होते. पोलिसांच्या कामगिरीचे सादरीकरण उपायुक्त बच्चनसिंग यांनी बनविले आहे.