Sharad Pawar on Dhananjay Munde । लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय प्रचार जोरात सुरु आहे. त्यातच शरद पवार आणि अजित पवार यांच्यातला संघर्ष जास्त जाणवत आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या याच टीकेला शरद पवारांनी उत्तर दिलंय. “धनंजय मुंडे हा लायकी नसलेला माणूस” असे वक्तव्य केले आहे.
“धनंजय मुंडे म्हणजे लायकी नसलेला माणूस” Sharad Pawar on Dhananjay Munde ।
शरद पवार बोलताना म्हणाले, “धनंजय मुंडे म्हणजे लायकी नसलेला माणूस. त्यांना कशा कशांतून बाहेर काढलं आहे हे जर सांगितलं तर त्यांना बाहेर फिरणं मुश्कील होईल. एकंदरीत त्यांनी केलेले उद्योग आणि इतर गोष्टींबाबत मी आत्ता बोलू इच्छित नाही. एका लहान कुटुंबातला उदयोन्मुख तरुण नेता म्हणून त्यांना हाताला धरुन विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी दिली. लोकांची नाराजी होती तरीही मी त्यांना ही जबाबदारी दिली. हे सगळं माहीत असतानाही ते माझ्यावर व्यक्तिगत हल्ले करु लागले आहेत. कुटुंबावर हल्ले करत आहेत. मी त्यांच्याबाबत आज जे बोललो ते शेवटचं यापुढे बोलणार नाही.” असे शरद पवारांनी म्हटलंय.
काय म्हणाले होते धनंजय मुंडे? Sharad Pawar on Dhananjay Munde ।
“तुम्ही (शरद पवार) पुलोद सरकार स्थापन केलं, ते संस्कार आणि अजित पवार महायुतीबरोबर गेले तर ते गद्दार? शरद पवारांनी भाजपाशी चर्चा केल्या होत्या. शिवसेनेला बाजूला ठेवण्याचा आग्रह केला. ते सगळे संस्कार होते, आम्ही निर्णय घेतला तर आम्ही गद्दार? ही निवडणूक भाऊबंदकीची नाही. देशाचा पंतप्रधान ठरवण्याची ही निवडणूक आहे. देशाचा पंतप्रधान मोदी होतील की इतर कोण? हे ठरवण्याची ही निवडणूक आहे.” असं धनंजय मुंडे म्हणाले.
धनंजय मुंडे हे दिवंगत भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे आहेत. त्यांनी भाजपातून त्यांची कारकीर्द सुरु केली. मात्र शरद पवार यांनी भाजपातून त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेतलं. त्यांना आत्तापर्यंत विविध जबाबदाऱ्याही दिल्या. मविआ सरकारमध्ये ते सामाजिक न्याय मंत्रीही होते. आता शरद पवार यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. यावर धनंजय मुंडे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.