राजगुरूनगर -खेड तालुक्यात करोना पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या आतापर्यंत 38 वर पोहोचली असून त्यापैकी दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत 23 जण ठणठणीत बरे होऊन घरी आले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे, खेड पंचायत समितीचे सभापती अंकुश राक्षे यांनी दिली.
खेड तालुक्यात वडगाव पाटोळे व आळंदी येथे प्रत्येकी एक व्यक्तीचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. चाकण नगर परिषद हद्दीत 4 जण पॉझिटिव्ह सापडल्यानंतर पुन्हा मेदनकरवाडीत दोन दिवसांपूर्वी एक रुग्ण सापडल्याने चाकण परिसरात खळबळ उडाली आहे. तालुक्यात जवळपास वीस गावांमध्ये करोनाचे लोन पसरले आहे. त्यापैकी काही गावातील रुग्ण बरे झाले आहेत. आळंदी, बहुळ, मेदनकरवाडी, चाकण येथे नव्याने करोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. प्रशासनाकडून वेळीच खबरदारी घेतली जात असल्याने रुग्णवाढीला आळा बसला आहे; मात्र पुणे, मुंबई येथे पॉझिटिव्ह रुग्णाच्या सान्निध्यात आलेले लोक तालुक्यात ये-जा करीत असल्याने ही संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
चाकण येथील एका कंपनीमध्ये काम करणारा कामगार मेदनकरवाडी येथे त्याच्या नातेवाइकाच्या घरी काही दिवस राहात होता. आजारी झाल्यानंतर त्याला खासगी रुग्णालयात ठेवण्यात आले होते. तेथे त्याला डेंग्यू झाल्याचे तपासणीत आढळून आले. त्यानंतर त्याची परिस्थिती बघून करोना स्वॅब टेस्ट केली असता तो पॉझिटिव्ह आल्याने त्याच्या संपर्कात आलेले व्यक्तींना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.
मेदनकरवाडी येथे कंपनीचा कामगार पॉझिटिव्ह आल्याने सभापती अंकुश राक्षे, बीडीओ अजय जोशी, माजी उपसभापती भगवान पोखरकर, आरोग्य विस्तार अधिकारी सुधाकर म्हानकाळे, स्थानिक आरोग्य कर्मचारी, आदी प्रशासनातील अधिकाऱ्यांनी भेटी देऊन खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या असून मेदनकरवाडीचा काही भाग कंटेन्मेंट झोन जाहीर केला आहे.
13 जणांवर उपचार सुरू
खेड तालुक्यातील राक्षेवाडी 5, पापळवाडी 4, कडूस 4, सुरकुंडी 3, चाकण, बुरसेवाडी, वाशेरे, वडगाव, पाईट, वाजवणे येथील प्रत्येकी एक असे 23 जण बरे होऊन त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. सध्या चाकण 4, मेदनकरवाडी 1, निघोजे 1 सुरकुंडी 2, बहुळ 1, येलवडी 4 असे 13 जणांवर उपचार सुरु आहेत.