नगर – दंड न भरता खाते बंद करण्यासाठी लाचेची मागणी करून तक्रारदाराकडून 4 हजार रूपयांची लाच स्विकारताना विक्रीकर अधिकारी व कर सल्लागार यांना नगरच्या विभागाच्या पोलीसांनी बुधवारी रंगेहाथ पकडले. तक्रारदार यांनी त्यांच्या पत्नीच्या नावे व्यवसाय करण्यासाठी डिसेंबर 2018 मध्ये जीएसटी नंबर काढला होता.परंतु काही कारणास्तव व्यवसाय सुरु करू शकले नाही.
म्हणून त्यांचा जीएसटी नंबर बंद करण्यासाठी कर सल्लागार निलेश सुरेश हरदास वय 32,रा.बेलापूर,ता.श्रीरामपूर यांच्यामाध्यमातून ऑनलाईन अर्ज केला.खात्यावर होणारा दंड न भरता खाते बंद करण्यासाठी कर सल्लागार हरदास यांनी विक्रीकर अधिकारी सुनील भास्कर टकले,वय,35,रा.पंचवटी कॉलनी,केडगाव यांच्यासाठी तडजोड म्हणून 3500 रूपये लाच व स्वतःसाठी 500 रूपये कमीशन असे मिळून चार हजार रूपयाची लाचेची मागणी केली.
याबाबत तक्रारदाराने नगर लाचलुचत प्रतिबंध विभागाकडे तक्रार केली. यावरून पोलिस निरीक्षक सुनील कडासने,अप्पर पोलीस अधिक्षक निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहरात हरीकमल प्लाझामधील हरदास यांच्या कार्यालयात सापळा रचला व त्यांना चार हजार रूपयांची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले.