पुणे – कौटुंबिक कलह आणि मालमत्तेच्या वादातून बापानेच आपल्या पोटच्या मुलाची 75 लाखांत खूनाची सुपारी दिली. जंगली महाराज रस्त्यावर भरदुपारी एका बांधकाम व्यवसायिकावर गोळीबार करून खूनाचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र सुदैवाने पिस्तूलातून गोळी झाडली न गेल्यामुळे बांधकाम व्यवसायिकाचा जीव वाचला होता. दरम्यान या प्रकरणाचा छडा गुन्हे शाखेने लावला असून, त्यामध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)
याप्रकरणी पोलिसांनी वडील दिनेशचंद्र ऊर्फ बाळासाहेब शंकरराव अरगडे पाटील ( 64,रा.भोसलेनगर), प्रशांत विलास घाडगे ( 38, रा. वारजे), अशोक लक्ष्मण ठोंबरे ( 48, रा. एरंडवणे), प्रवीण उर्फ पर्या तुकाराम कुडले ( 31, सुतारदरा), योगेश दामोदर जाधव (39) व चेतन अरुण पोकळे ( 27) यांना अटक केली आहे. याबाबत धीरज दिनेशचंद्र अरडगे ( 38,रा. खडकी) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता.
जंगली महाराज रस्त्यावर अरगडे हाईट्स या इमारतीच्या खाली भरदुपारी 16 एप्रिल रोजी बांधकाम व्यवसायिक धीरज अरगडे यांच्यावर दुचाकीवर स्विगीचे टीशर्ट व हेल्मेट आणि मास्क घालून आलेल्या दोघांनी पिस्तूलातून गोळी झाडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र सुदैवाने पिस्तुल कॉक न झाल्याने गोळी झाडली गेली नाही, म्हणून धीरज यांचे प्राण वाचले.
दरम्यान सलग गोळीबाराच्या घटना घडत असल्याने शहरात एक दहशतीचे वातावरण देखील तयार झाले होते. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडून सुरू होता. त्यावेळी युनिट एकच्या पथकाने परिसरातील सीसीटीव्ही व तांत्रिक माहिती घेतली. त्यानुसार गुन्ह्याचा छडा लागला आहे. प्रत्यक्ष गोळीबाराचा प्रयत्न करणार्या आरोपींना पोलिसांनी पकडले. त्यांच्या चौकशीत वडिलांची माहिती समोर आली. दरम्यान धीरजला मारण्यासाठी पंधरा दिवसापासून पाळत ठेवली होती.
ही कामगिरी पोलिस आयुक्त अमितेश कुमार, अपर पोलिस आयुक्त गुन्हे शैलेश बलकवडे, उपायुक्त अमोल झेंडे, सहाय्यक आयुक्त सुनील तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट एकचे वरिष्ठ निरीक्षक शब्बीर सय्यद, रंगराव पवार, सहायक पोलिस निरीक्षक आशिष कवठेकर, उपनिरीक्षक रमेश तापकीर, पोलीस अंमलदार आण्णा माने, निलेश साबळे, अनिकेत बाबर, राजेंद्र लांडगे, अमोल आव्हाड,महेश बामगुडे, अय्याज दड्डीकर, राहुल मखरे, दत्ता सोनवणे, अभिनव लडकत यांच्या पथकाने केली.