पारनेर पाणीप्रश्नावर रविवारी राळेगणसिद्धीला मेळावा

पारनेर – तालुक्‍यातील विविध क्षेत्रातील भूमीपुत्रांनी एकत्र येत सुरू केलेल्या आम्ही पारनेरकर सामाजिक विचारपीठाच्या माध्यमातून तालुक्‍यातील पाणी प्रश्न व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन याबाबत भूमिका ठरविण्यासाठी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली मेळाव्याचे आयोजन रविवारी,दि.17 संध्याकाळी 6 वाजता राळेगणसिद्धी येथील नवलभाऊ फिरोदिया सभागृहात करण्यात आल्याची माहिती प्रमुख मार्गदर्शक डॉ.बाळासाहेब बांडे ,पारनेर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष देविदास अबुज, सचिव शरद झावरे यांनी दिली.

आम्ही पारनेरकर सामाजिक विचारपीठ,राळेगणसिद्धी परिवार,आम्ही टाकळीकर ग्रामविकास प्रतिष्ठान व पारनेर तालुका पत्रकार संघाच्या वतीने या मेळाव्याचे आयोजन केले आहे. तालुक्‍यातील पाणीप्रश्नावर काम करणारे विविध क्षेत्रातील कार्यकर्ते या मेळाव्यात पाणीप्रश्नावर भूमिका मांडणार आहेत. सामाजिक संस्था, शासन व लोकसहभाग याचा विचार करून उपलब्ध पाणी त्याचा वापर व बचत, प्रस्तावित प्रकल्पाच्या माध्यमातून तालुक्‍यात आणता येऊ शकणारे पाणी यावर चर्चा होऊन पाणीप्रश्नावर एक दिशा या मेळाव्यात ठरेल.

तसेच तालुक्‍यातून अधिकाधिक प्रशासकीय अधिकारी तयार झाले तर स्थानिक प्रश्न शासनदरबारी सुटण्यास मदत होईल या उद्देशाने युवकांचा कल स्पर्धा परिक्षेकडे वाढावा यासाठी या मेळाव्यात उपाययोजना ठरविण्यात येणार आहेत. मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजन समितीच्यावतीने सुरेश पठारे यांनी केले आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.