सातत्याने आढळतात शंभरहून अधिक रुग्ण : एकूण बाधित 2100च्या पुढे
पिंपरी – शहरात सुरू झालेला करोनाचा उद्रेक शांत होण्यास तयार नाही. गेल्या काही दिवसांपासून रोज करोनाबाधितांचा आकडा शंभरी पार करत आहे. बुधवारी रात्री (दि.24) महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार शहरातील 100 आणि शहराबाहेरील 5 रुग्णांना करोनाची लागण झाली आहे. त्याचवेळी महापालिकेच्या डॅशबोर्डने प्रकाशित केलेल्या माहितीनुसार शहरातील 123 जणांना करोनाची लागण झाली आहे. शहरातील दोन रुग्णांचा करोनाने मृत्यू झाला आहे.
महापालिकेच्या डॅशबोर्डनुसार आजपर्यंत 2161 रुग्णांना लागण झाली आहे, तर महापालिकेच्या प्रेसनोटनुसार 2134 जण करोनाबाधित झाले आहेत. सध्या शहराबाहेरील 71 रुग्ण महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत, तर शहरातील 835 करोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत. उपचारांनंतर 55 करोनाबाधितांना बुधवारी डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत एकूण 1522 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. बुधवारी एकूण 394 संशयित रुग्णांना दाखल करण्यात आले आहे. अद्याप 352 रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत.
आज चाचणी अहवाल सकारात्मक आलेले रुग्ण वैदुवस्ती पिंपळे गुरव, जैन मंदिर, दिघी रोड, आदर्शनगर दिघी, नढेनगर, मोरेश्वर कॉलनी थेरगाव, अजंठानगर, चिखली, वडमुखवाडी, बिजलीनगर, नखातेनगर थेरगाव, बोपखेल, नवी सांगवी, धावडेवस्ती, चिंचवड, नेहरुनगर, विजयनगर, भोसरी, पिंपरी, काळभोरनगर, दापोडी या परिसरातील आहेत. तर शहराबाहेरील कुर्डुवाडी, सदाशिवपेठ, तळेगाव, चाकण येथील पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
आज रुग्णालयातून घरी सोडलेले रुग्ण 55 रुग्ण हे रमाबाईनगर, सांगवी, थेरगाव, मोरवाडी, वैभवनगर, निगडी, मोशी, काळभोरनगर, पिंपळे निलख, चर्होली, संभाजीनगर, बालाजीनगर, चिखली, रुपीनगर या परिसरातील आहेत.
अनेक प्रयत्नांनंतरही करोना आटोक्यात येत नाहीत. सुरुवातीला आटोक्यात असलेला करोना दारू विक्रीस परवानगी मिळाल्यानंतर आणि लॉकडाऊनचे नियम शिथिल झाल्यानंतर खूपच वेगाने पाय पसरत आहे. रोज शंभरहून अधिक रुग्ण आढळत असून होत असलेल्या चाचण्यांपैकी पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाणही वाढले आहे. आतापर्यंत 14799 संशयित रुग्णांचे स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी 12272 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तसेच 352 संशयित रुग्णांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. जून महिन्यात वाढते मृत्यूचे प्रमाण शहरवासियांसाठी आणि प्रशासनासाठी चिंतेचे कारण बनले आहे.