COVID 19 (JN.1) : मागच्या काही दिवसापांसून देशात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसत आहे.त्यामुळे नागरिकांसह आरोग्य यंत्रणादेखील अलर्ट मोडवर आली आहे. दरम्यान, २०२३ च्या वर्षाच्या शेवटी देशभरात कोरोनाने आपले हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाच्या नवीन JN.1 सब-व्हेरियंटमुळे देशात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. केरळ, कर्नाटक, दिल्लीसह नऊ राज्यांमध्ये कोरोनाच्या नवीन व्हेरियंटचे रुग्ण आढळून आले आहेत.
देशात कोरोनाचे आतापर्यंत 3997 सक्रिय रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 743 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर गेल्या 24 तासांत कोरोना संसर्गामुळे 7 रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोरोना मृतांमध्ये केरळमध्ये 3, कर्नाटकात 2 आणि छत्तीसगड आणि तामिळनाडूमध्ये प्रत्येकी 1 रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.
दिल्लीमध्ये कोरोनाची परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. पण, केवळमध्ये सातत्याने नवीन रुग्णांची भर पडताना दिसत आहे. प्रशासनाने कोरोना चाचण्यांमध्ये वाढ केली आहे. दिल्लीत शनिवारी कोरोनाच्या 11 नवीन रुग्णांची नोंद झाली असून सात रुग्ण बरे झाले आहेत. सध्या दिल्लीत सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 51 आहे आणि आतापर्यंत दिल्लीतील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 20,14,467 वर पोहोचली आहे.
दरम्यान, कोरोना विषाणू आल्यापासून त्याची रूपे वेळोवेळी बदलत आहेत. अलीकडेच, दिल्लीमध्येही कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचा सब-व्हेरियंट JN.1 चा पहिला रुग्ण आढळला आहे. मात्र, उपचारानंतर आता हा रुग्ण बरा झाला आहे. येत्या काही दिवसांत कोविड विषाणूच्या नवीन प्रकारांचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. कोरोनाचा नवीन व्हेरियंट वेगाने पसरत आहे पण, दिलासादायक बाब म्हणजे याची लक्षणे सौम्य आहेत.