उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर शिक्षण विभागाचा ‘यू-टर्न’
पुणे – शालेय शिक्षण विभागाने सुधारित मार्गदर्शक सूचना जारी करीत पूर्वप्राथमिक ते इयत्ता दुसरीपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्याचे आदेश शाळांना दिले आहेत. यासाठी कालावधी निश्चित करण्यात आला आहे.
यापूर्वी पूर्वप्राथमिक (बालवाडी) ते इयत्ता दुसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन शिक्षणाचा प्रयत्न करू नये, असा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला होता. दरम्यान, “पूर्व प्राथमिक ते दुसरीपर्यंतच्या वर्गाला ऑनलाइन शिक्षण देणाऱ्या शाळांवर कारवाई करू नये,’ असे अंतरिम आदेश उच्च न्यायालयाने दिल्यानंतर शिक्षण विभागाने “यू-टर्न’ घेतला आहे. त्यामुळे पूर्वप्राथमिक व इयत्ता दुसरीपर्यंतचे शिक्षण ऑनलाइनद्वारे होणार आहे.
पूर्व प्राथमिकचे वर्ग सोमवार ते शुक्रवार 30 मिनिटे घेणार असून पालकांशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. तर पहिली आणि दुसरी इयत्तेसाठी सोमवार ते शुक्रवार 30 मिनिटांमध्ये दोन सत्र घेतले जाणार असून 15 मिनिटे पालकांशी संवाद व मार्गदर्शन तसेच 15 मिनिट विद्यार्थ्यांना उपक्रम आधारित शिक्षण दिले जावे, असे निर्देश शाळांना दिले आहेत.
दरम्यान, उच्च न्यायालयाच्या सूचनेनंतर शिक्षण विभागाने नवीन परिपत्रक जाहीर करून आता पूर्व प्राथमिक व पहिली, दुसरीसाठीसुद्धा ऑनलाइन वर्ग घेण्याचे वेळापत्रक दिले आहे. यामध्ये तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची 45 मिनिटांची दोन सत्रे शाळा घेऊ शकणार आहेत, तर नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांची 45 मिनिटांची एकूण चार सत्रे शाळा घेऊ शकणार असल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. ऑनलाइन शिक्षणाच्या बाबतीत शिक्षक, पालकांना देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करण्याचे निर्देश उपसचिव राजेंद्र पवार यांनी दिले आहेत.
सद्यस्थितीत वैद्यकीय परीक्षा नको
कोविड-19 चा प्रादुर्भाव कमी होताच या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यात याव्यात. तसे केंद्रीय मंडळाला कळवण्यात यावे. पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी सध्या कॅम्पसमध्येच असल्यामुळे याबाबत फारशी अडचण येणार नाही, अशी ग्वाही अमित देशमुख यांनी दिली. या विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणासाठीची प्रवेश परीक्षा 15 सप्टेंबर रोजी असल्याने विद्यार्थ्यांच्या परीक्षा ठरल्यानुसार वेळेवर घेण्यात याव्यात. मात्र, कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे ऐन वेळी अडचण निर्माण झाल्यास परिस्थिती पाहून याबाबत निर्णय घेण्यात यावा, अशा सूचनाही अमित देशमुख यांनी महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाच्या कुलगुरूंना दिल्या.