पुणे – ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि अस्त्र झेनेका यांनी विकसित केलेल्या औषधाची चाचणी मुंबई आणि पुण्यात असलेल्या कोविड-19 च्या हॉटस्पॉटमध्ये घेण्यास मदतच होईल, असे या औषधांचे उत्पादन करत असलेल्या सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाने म्हटले आहे. या औषधांच्या चाचणीचा भाग म्हणून ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत पुणे आणि मुंबईतील 4 ते 5 हजार लोकांना ही लस टोचण्यात येईल. औषधांची ही चाचणी दोन महिने चालेल, असेही सीरम इन्स्टिट्युटने म्हटले आहे.
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने विकसित केलेल्या लसीच्या चाचणीचे निष्कर्श समाधानकारक असून आता ब्रिटनमध्ये अधिक व्यापक प्रमाणात चाचण्या घेतल्या जात आहेत. भारतामध्ये उत्पादनासाठी सीरम इन्स्टिट्युटला व्यापक चाचण्या करण्यासाठी भागीदार म्हणून निवडण्यात आले आहे. ही लस भारतीयांसाठी सुरक्षित आणि परिणामकारक ठरण्यासाठी अशा व्यापक चाचण्यांची आवश्यकता आहे.
पुणे जिल्ह्यामध्ये 59 हजार बाधित रुग्ण आहेत. तर मुंबईमध्ये 1.03 लाख रुग्ण नोंदले गेले आहेत. या दोन्ही शहरांमध्ये मिळून महाराष्ट्रातील एकूण करोना रुग्णांच्या निम्मे रुग्ण आहेत. तर देशभरातील एकूण करोना रुग्णांच्या संख्येच्या एकदशांश रुग्ण या दोन शहरांमध्येच आहेत. मुंबई आणि पुण्यात चाचण्या घेण्याची अनेक प्रमुख ठिकाणे निवडण्यात आली आहेत. या शहरांमध्ये अनेक हॉटस्पॉट आहेत. त्याच हॉटस्पॉटच्या माध्यमातून औषधाची परिणामकारकता समजण्यास मदत होईल, असे कंपनीचे मुख्य कार्यकारी आदर पूनावाला यांनी वृत्तसंस्थेला सांगितले.
“ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया’कडून आवश्यक परवानगी मिळाल्यानंतर कोविशील्ड नावाने विकसित करण्यात आलेल्या औषधाच्या महत्वाच्या फेज-3 च्या चाचण्यांना सीरम इन्स्टिट्युटच्यावतीने भारतात ऑगस्टमध्ये सुरुवात करण्यात येईल. “डीसीजीआय’ने सुरक्षितता आणि परिणामकारकतेबाबत आवश्यक मार्गदर्शक सूचनांचा विचार करून त्वरित मंजूरीद्वारे सहाय्य केले आहे. आम्हाला घाई करायची नसून केवळ एक व्यवहार्य व प्रभावी उत्पादन देण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल, असेही ते म्हणाले.
या औषधाचा डोस 1 हजार रुपयांपेक्षा कमी दराने विक्रीचे सीरम इन्स्टिट्युटचे उद्दिष्ट आहे, असे पूनावाला यांनी मंगळवारी सांगितले होते. प्रारंभिक आणि परवाना चाचण्यांच्या यशानंतर या वर्षाच्या अखेरीपर्यंत 300 ते 400 दशलक्ष डोस तयार करण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे. त्यानंतर दिवसाला 60 ते 70 दशलक्ष डोस उत्पादन सुरू केले जाईल, असे आदर पूनावाला यांनी सांगितले.