बीजिंग – अमेरिका आणि चीनने द्विपक्षीय संबंध सुधारण्याच्या दृष्टीने काही मुद्द्यांवर एकत्र काम करणे सुरू ठेवण्याचे मान्य केले आहे. तीन दिवसांच्या चीन दौऱ्यावर आलेले अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँन्टोनी ब्लिंकेन यांनी चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी आणि इतर वरिष्ठ चिनी अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यांनी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी केलेल्या चर्चेदरम्यान द्विपक्षीय संबंध सुधारण्याबाबत सहमती दर्शवली आहे.
चीनमध्ये ताब्यात घेण्यात आलेल्या अमेरिकेच्या नागरिकांच्या सुटकेच्या मुद्यावरही ब्लिंकेन यांनी भर दिला. तसेच दक्षिण चीन समुद्रातील वाहतुक स्वातंत्र्य, हॉंगकॉंगची स्वायत्तता, चीनमधील शिन्जियांग प्रांतातील मानवी हक्कांचे उल्लंघन आणि तिबेटच्या स्वातंत्र्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला असल्याचे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी सांगितले.
अमेरिकेच्या निवडणुकीमध्ये चीनकडून हस्तक्षेप केला जात नसल्याचे चीनच्या अधिकाऱ्यांनी वारंवार स्पष्ट केले आहे. तसेच द्विपक्षीय संबंध सुधारण्याच्या दृष्टीने द्विपक्षीय चर्चेची वारंवारता वाढवण्यास देखील दोन्ही बाजूंनी सहमती दर्शवल्याचे अमेरिकेच्या प्रवक्त्यांनी सांगितले.