जुन्नर -जुन्नर तालुक्यात गुरुवारी (दि. 23) जुन्नर शहर, बारव, आळे, बेल्हे येथे प्रत्येकी एक तर ओतूर येथे दोन रुग्ण नव्याने आढळून आल्यामुळे एकूण करोनाबधितांची संख्या 322 झाली आहे. त्यांपैकी 147 ऍक्टिव्ह तर 165 नागरिक या रोगातून बरे झाले आहेत.
तर उदापुर येथे एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यामुळे तालुक्यातील एकूण करोनाबळींची संख्या दहा झाली आहे. करोनाबाधित रुग्ण आढळलेली सर्व क्षेत्रे प्रतिबंधित म्हणून जाहीर करण्यात आली असून अनेक ठिकाणी पत्रे व बांबू लावून मार्ग बंद करण्यात आले आहेत.
दरम्यान तालुक्यातील लेण्याद्री कोविड सेंटरमध्ये संशयित रुग्णांच्या स्वॅबचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच पुणे येथील एनआयव्ही लॅबमध्ये जिल्ह्यातून मोठ्या संख्येने येणाऱ्या नमुन्यांमुळे अहवाल देण्यास उशीर होत आहे. त्यामुळे लेण्याद्री येथील सेंटरमध्ये लवकरच रॅपिड टेस्टिंग पद्धत सुरू करणार असल्याचे आमदार अतुल बेनके यांनी सांगितले.
जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यात रॅपिड टेस्टिंगला सुरुवात झाली असून जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ही किट्स उपलब्ध होणार आहेत. त्यासाठीचे कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग देण्यात येणार असून लेण्याद्री येथे वातानुकूलित लॅब उभारणार आहे. या टेस्टमुळे स्वॅब चाचणीवरील ताण कमी होऊन अहवाल लवकर प्राप्त होणार असल्याचे बेनके यांनी सांगितले.
दरम्यान लोकसहभागातून लेण्याद्री येथील बेड्सची संख्या वाढवून 242 केली आहे. स्वॅब घेण्यासाठी नव्याने 2 बूथ उभारण्यात येणार आहे. ओझर येथील केंद्रांची उभारणी संस्था व दानशूर व्यक्तींच्या सहभागातून होत आहे. नव्याने सुरू होणाऱ्या केंद्रासाठी मोबाईल टॉयलेट, बेड्स तसेच आधुनिक उपकरणांची सोय करणार आहे.