नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता पक्षाची प्रचार मोहीम पुढे नेण्यासाठी ॲक्शन मोडमध्ये आल्या आहेत. त्या शनिवारी दिल्लीतील पहिल्या रोड शोमध्ये सहभागी झाल्या.
दिल्ली मद्य घोटाळ्याशी संबंधित मनी लॉण्डरिंग प्रकरणी ईडीने केजरीवाल यांना अटक केली. ऐन निवडणूक काळात ती घडामोड घडली. त्यामुळे आपची प्रचार मोहीम प्रभावित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मात्र, केजरीवाल यांच्या अनुपस्थितीत सुनीता आपच्या प्रचार मोहिमेची धुरा सांभाळतील, असे पक्षाकडून जाहीर करण्यात आले. त्या पार्श्वभूमीवर, पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघातील सुनीता यांचा रोड शो लक्षवेधी ठरला.
रोड शोवेळी त्यांनी दिल्लीकरांना उद्देशून भाषण केले. शाळा, मोहल्ला क्लिनिक्सची उभारणी केल्यामुळे आणि मोफत वीज पुरवल्यामुळे केजरीवाल यांना अटक करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही वाचवण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले. दरम्यान, पंजाब, गुजरात आणि हरियाणा या राज्यांतही सुनीता आपचा प्रचार करणार आहेत. तो पक्ष इंडिया आघाडीचा घटक म्हणून लोकसभा निवडणुकीला सामोरा जात आहे.