वाघोली (प्रतिनिधी) : वाघोलीतील एका नामांकित शाळेत एका कर्मचाऱ्याने १० वर्षाच्या विद्यार्थ्याचा लैंगिक छळाचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या विरोधात विद्यार्थ्याच्या आईने लोणीकंद पोलीसात फिर्याद दिली असून कर्मचाऱ्यावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, या शाळेत फिर्यादी यांचा १० वर्षीय मुलगा शिक्षण घेत आहे. १९ एप्रिलला फिर्यादी यांनी त्याला शाळेमध्ये सोडल्यानंतर कर्मचाऱ्याने विद्यार्थ्याला त्याचे नाव विचारून तू “मुव्ही बघतो की नाही.
मी तुला एक फिल्म दाखवतो टॉयलेटमध्ये चल.. असे सांगितले. त्याला त्या विद्यार्थ्याने नकार दिला. यावर त्या कर्मचाऱ्याने इथले सगळे कॅमेरे बंद आहेत. तू काही काळजी करू नकोस कोणाला काही समजणार नाही असे सांगितले आणि त्याच्यावर जबरदस्ती करू लागला.
या कृतीला घाबरून तो विद्यार्थी तेथून पळून गेला. यानंतर तो कर्मचारी पुन्हा वर्गात आला. तुला इथेच फिल्म दाखवतो असे बोलून त्यांने मोबाईलमध्ये एक अश्लील वेबसाईट दाखवली आणि कोणाला काही सांगू नको अशी धमकी दिली.
घाबरलेल्या विद्यार्थ्याने सदर प्रकार आईला सांगितला. यानंतर आईने फिर्याद दिल्यानंतर लोणीकंद पोलीस ठाण्यात या प्रकरणी पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या बाबत तपास सुरू असल्याचे लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास करे यांनी सांगितले. तात्काळ संबंधित कर्मचाऱ्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी पालकांकडून व्यक्त केली जात आहे