उपस्थित राहण्यासाठी 24 तासांचा अल्टिमेटम
पुणे – शहरात नवीन करोनाबाधित रुग्ण आढळत आहेत, त्या भागात महापालिकेकडून घरोघरी सर्वेक्षण केले जाते. मात्र, यासाठी वारंवार सूचना देऊनही 170 शिक्षकांनी दांडी मारली आहे. त्यामुळे पालिकेने या शिक्षकांना 24 तासांचा अल्टिमेटम दिला आहे. हजर न राहिल्यास थेट निलंबन कारवाई केली जाणार असल्याचे सामान्य प्रशासन उपायुक्त अनिल मुळे यांनी स्पष्ट केले.
करोनाची साथ पसरल्यानंतर महापालिकेने घरोघरी सर्व्हेक्षण सुरू केले आहे. त्यासाठी आठशे टीम नेमल्या आहेत. यात शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. मात्र, शिक्षक हजर न झाल्याने हजर असलेल्या अनेकांना साप्ताहिक सुटीही मिळालेली नाही.
परिणामी, प्रामाणिक कर्मचारी नाराज आहेत. त्यामुळे आता प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. या 170 जणांना नोटीस देऊन, सूचना देऊनही ते हजर राहत नाहीत, तसेच राजकीय वशिला पुढे करून प्रशासनावर दबाव आणत आहेत. त्यामुळे प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेतली आहे.