सातारा, (प्रतिनिधी) – लोकसभा निवडणुकीसाठी शिक्षकांची नेमणूक करण्यात आली असून सध्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरु असताना याच कालावधित निवडणूक विभागाने प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे.
या प्रशिक्षणासाठी शिक्षकांना उपस्थित राहणे बंधनकारक असल्याने शनिवारी माध्यमिक विभागाचा पाचवी ते नववीचा होणारा पेपर रद्द करुन सोमवारी (दि..८) घेण्यात येणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी शिक्षक, ग्रामसेवकांसह विविध विभागांच्या कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. या निवडणुकीत झोनल अधिकारी, मतदान केंद्राध्यक्ष, केंद्रावरील प्रथम निवडणूक अधिकारी यांना मतदान प्रक्रियेबाबत जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात प्रशिक्षणांचे आयोजन करण्यात आले आहे.
या प्रशिक्षणासाठी शिक्षक व अन्य नेमणूकच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणास उपस्थित राहणे बंधनकारक असल्याने माध्यमिक विभागाच्या परीक्षेमधील पाचवी ते नववीचा पेपर पुढे ढकलण्यात आला होता. हा पेपर सोमवारी होणार असल्याची माहिती शिक्षण विभागातून देण्यात आली.