कराड -कराड तालुक्यात करोनाचा संसर्ग वाढू लागल्याने बाधित रुग्ण सापडलेल्या गावांसह कराड व मलकापूर ही शहरे आणि परिसरातील 11 गावे कंटेनमेंट झोनमध्ये (प्रतिबंधित क्षेत्र) समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यानुसार गुरुवारपासून या सर्व गावांमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. हा लॉकडाऊन अनिश्चित कालावधीसाठी असून पहिल्याच दिवशी या गावांमधून शंभर टक्के प्रतिसाद मिळाला.
सातारा जिल्ह्याच्या तुलनेने एकट्या कराड तालुक्यातील करोनाबाधितांचा आकडा निम्मा असल्याने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कडक पावले उचलत बुधवारी रात्री 12 नंतर कराड व परिसरात 100 टक्के लॉकडाऊन जाहीर केला. पुणे, मुंबईच्या धर्तीवर लॉकडाऊनमध्ये निर्बंध लागू करण्यात आले असून माध्यमांची कार्यालये व दवाखान्यांशिवाय कोणतीही आस्थापना सुरू ठेवण्यास परवानगी नाही. कराड नगरपरिषद हद्द, उपनगरे, परिसरातील ग्रामपंचायतींचा समावेश प्रतिबंधित क्षेत्रात करण्यात आला असून इन्सिडंट कमांडर म्हणून प्रांताधिकारी उत्तम दिघे यांची नेमणूक करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी बुधवारी कराडची पाहणी करून बैठका घेतल्या. त्यातून विदारक चित्र समोर आल्याने त्यांनी कराडकरांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला.
कराड शहरातील पोलीस पेट्रोल पंपाव्यतिरिक्त उर्वरित पेट्रोल पंप बंद ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे वैद्यकीय सेवेतील वाहनांनाही पोलिसांच्या पेट्रोल पंपातून इंधन मिळत आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पोलीस प्रशासनाने कराड शहरातील सर्व भागातून येणाऱ्या रस्त्यांवर बॅरिकेडस् लावले आहेत. कोणताही नागरिक कोठूनही वाहनावरून येऊ शकणार नाही, असे नियोजन करण्यात आले आहे.
काही नागरिकांनी आज सकाळी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला तर काहींनी कॉलन्यांमध्ये कॅरम व पत्त्यांचे डाव मांडले. त्यांना पोलिसांच्या दंडुक्याचा प्रसाद मिळाला. त्यामुळे काही अपवाद वगळता कराड, मलकापूर व अन्य अकरा गावांमधील रस्ते दिवसभर निर्मनुष्य होते. करोनाबाधितांचा आकडा रोज वाढत असल्याने या क्षेत्रातील नागरिकांना अनिश्चित कालावधीसाठी लॉकडाऊनला सामोरे जावे लागणार आहे.