पिंपरी, (प्रतिनिधी) – निवडणुकीच्या कामांचा अतिरिक्त भार असल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षकांची उन्हाळी सुट्टी शाळाबाह्य कामातच जाणार आहे. महापालिकेचे एकूण १ हजार ३०० शिक्षक या कामात व्यस्त आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक विभागांतर्गत १ हजार ३०० शिक्षकांचा समावेश होत आहे. या शिक्षकांना सध्या निवडणूक कामात गुंतविण्यात आले आहे. एप्रिल आणि मे महिना उन्हाळी सुट्ट्यांचा असतो. शैक्षणिक वर्ष संपते ना संपते तोच लोकसभा निवडणूक प्रशिक्षण, शाळेचा पट वाढीसाठी विद्यार्थीची शोधा शोध सुरू झाली. त्यात भरीत-भर म्हणून पॅट परीक्षेच्या निकाल ऑनलाइन भरण्याची नवी डोकेदुखी सुरू झाली आहे.
त्यामुळे शिक्षकांची या कामामध्ये पुरती दमछाक झाल्याचे पहायला मिळत आहे. या वर्षी दोन महिन्यांची उन्हाळी सुटी मिळणार, अशी आशा शिक्षकांना होती. मात्र या स्वप्नावर पाणी फिरले आहे. सध्या लोकसभा निडणुकीचे प्रशिक्षण, निवडणूक कार्यक्रम सुरू आहे. या बरोबरच शाळेच्या निकालाची तयारी व निवडणूक ड्यूटीमध्ये १५ एप्रिल ते ८ मे हा काळ जाणार आहे.
त्यानंतर शाळेचा पट वाढवण्यासाठी पालकांचे उंबरे झिजवण्यासाठी १० दिवस जाणार आहेत. नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने इयत्ता पाचवी व आठवीतील विद्यार्थ्यांना नापास करण्याच्या निर्णयामुळे शिक्षकांची त्रेधातिरपिट उडणार आहे.
कारण इयत्ता पाचवी आणि आठवीचा निकाल हा वेगळा लावावा लागणार आहे. यात विद्यार्थी नापास झाला, तर त्याला मार्गदर्शन करून दोन महिन्यांनी पुन्हा परीक्षा घ्यावी लागणार आहे. या सुटीतील कामाच्या बोजात शिक्षकाला विद्यार्थ्यांच्या पास नापासची पडलेली चिंता आहे.
यंदा पॅट परीक्षेची माहिती ऑनलाइन भरण्याची सक्ती करण्यात आली होती. यामधील तां.ित्रक बाबी समजून घेण्यात शिक्षकांचे ५ ते १० दिवस गेले. या कामाच्या व्यापात शिक्षकांकडे केवळ आठच दिवसांची सुटी उरणार आहे. उन्हळ्याच्या सुटीत अतिरिक्त कामाच्या बोजाने शिक्षकांची मोठी डोकेदुखी वाढली आहे. या सर्व कामाच्या ताणामुळे शासनाच्या या राबवलेल्या धोरणामुळे शिक्षकांमधून तीव्र नाराजीचा सूर उमटू लागला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक विभागाचे एकूण १ हजार ३०० शिक्षक आहेत. सध्या निवडणुकीचा कार्यक्रम राबविला जात आहे. या कामासाठी प्राथमिक आणि माध्यमिक दोन्ही विभागाचे शिक्षक कार्यरत आहेत. – विजयकुमार थोरात, सहायक आयुक्त, शिक्षण विभाग,