सातारा -लॉकडाऊन सुरू असतानाही तीन परमीटबार चालकांनी लपूनछपून दारू विकल्याचे समोर आल्यानंतर उत्पादन शुल्क विभागाने त्यांच्यावर कारवाई केली. दरम्यान, या कारवाईचा प्रस्ताव पाठविण्यात आल्यानंतर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी तीनही परमीट बारचे परवाने कायमस्वरूपी रद्द केले आहेत. त्यामुळे इतर बारचालकांनी चांगलाच धसका घेतला आहे.
राज्यात संचार बंदी व आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी मद्य विक्री बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यातील 423 परमिटबारला सील ठोकले आहे. असे असतानाही रहिमतपूर येथील हॉटेल काका रेस्टॉरंट येथे तसचे फलटण तालुक्यातील साठे फाटा येथील हॉटेल अनुराग आणि खंडाळ्यातील युवा बिअर शॉपी या तीन परमीट बारचालकांनी लॉकडाऊनचा आदेश धुडकावून सील तोडून चोरून मद्यविक्री केल्याचे निदर्शनास आले. उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक अनिल चासकर यांच्या मार्गदर्शनाखाली या तीन परमीट बारचालकांवर गुन्हे दाखल करून पुढील कारवाईचा प्रस्ताव जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे पाठविण्यात आला होता. या प्रस्तावावर जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ दखल घेत तिन्ही परमीट बारचे परवाने कायमस्वरूपी निलंबित केले आहेत.