लोणावळा -अवैध धंद्यांवर लोणावळा शहर पोलिसांनी जोरदार कारवाईला सुरवात केली आहे. मागील तीन दिवसांत शहरातील विविध भागात बेकायदेशीररित्या दारू विक्री करणाऱ्या 6 जणांच्या विरोधात तसेच अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या 2 जणांच्या विरोधात पोलिसांनी कारवाई केली आहे.
लोणावळा शहरात अवैध धंद्यास आळा बसविण्याकरीता लोणावळा शहर पोलीस ठाण्याकडून गुन्हे शोध पथक मार्फत माहिती काढून अवैध धंद्यांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. पोलिसांनी मागील तीन दिवसांत विविध ठिकाणी छापे टाकले असून या छापा सत्रात तुंगार्ली गावातील काच बंगल्याच्या समोर असलेल्या सेंट किराणा दुकानाच्या मागील बाजूस असलेल्या परशुराम निकम (वय 50, रा. हनुमान टेकडी, लोणावळा), वलवण येथील हॉटेल सेंटर पॉईंटच्या पाठीमागील भिंतीचे आडोशास नंदकुमार शिवराम घाडगे (वय 63, रा. हॉटेल सेंटर पॉईंट, वलवण, लोणावळा) तसेच वलवण ब्रिजच्या खाली धिरज गुरुनाथ शिंदे (वय 21, रा. महादेव मंदिर जवळ, वलवण, लोणावळा) व मनोज मनोहर घारे (वय 42) यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे. याशिवाय ठोंबरेवाडी येथील रोडच्या कडेला सागर अशोक काळे (वय 29), नंदु भरत शिंदे (वय 50) आणि गौरव सुरेश गवळी (वय 40, सर्व रा. ठोंबरेवाडी, लोणावळा) या सहा जणांना बेकायदा दारुची विक्री करताना पकडले. आरोपींकडून 64 हजार 230 रुपयांचा माल हस्तगत केला आहे.
तसेच लोणावळा पोलिसांनी गावठाण येथील भूत बंगला परीसरात चिराग अशोक देवरा (रा. कुसगाव. ता. मावळ) आणि प्रियांशु उर्फ किटटू प्रेम उठवाल (रा. सिध्दार्थनगर, लोणावळा) या दोघांना गांजा या अंमली पदार्थाचे सेवन करताना पकडले. त्यांच्या विरोधात लोणावळा पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस ऍक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे.