Supriya Sule : राष्ट्र्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (OM Birla) यांना खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांचे तात्काळ निलंबन करा, अशी मागणी करणारे एक पत्र लिहिले आहे. परिशिष्ट दहानुसार पक्षविरोधी कृती केल्याने सुनील तटकरे यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी पत्राच्या माध्यमातून सुप्रिया सुळेंनी लोकसभा अध्यक्षांना विनंती केली असल्याचे सांगण्यात येत आहे.
खासदार सुनील तटकरे यांना अपात्र करण्यासाठी आम्ही 4 जुलैला याचिका दाखल केली होती. मात्र, आजपर्यंत त्यावर कुठलीही करावी केली गेली नाही. त्यामुळे लवकरात लवकर निर्णय घ्या, अशी विनंती खासदार सुप्रिया सुळे यांनी ओम बिर्ला (Supriya Sule Request To Om Birla) यांच्याकडे केली आहे.
त्यासोबतच चार महिने उलटून देखील कोणतीही कारवाई न झाल्याने सुप्रिया सुळे यांनी पत्राच्या माध्यमातून खंत व्यक्त केली. कारवाई होत नसल्याने परिशिष्ट दहाचे उल्लंघन होत असल्याची बाब सुप्रिया सुळेंकडून नमूद करण्यात आली आहे.
पक्षाच्या या दोन खासदारांनी राष्ट्रवादी पक्षाची विचारसरणी बाजूला सारले आहे. स्वतःच्या राजकीय महत्त्वाकांक्षा साध्य करण्यासाठी या नेत्यांनी पक्षविरोधी कारवाई केली आहे. तसेच राष्ट्रवादीला देण्यात आलेल्या मतांना त्यांनी न जुमानता मतदारांचाही विश्वासघात केला आहे. त्यामुळे राज्यघटनेच्या 10 व्या परिशिष्टानुसार, पक्षांतरबंदी कायद्यांच्या अंतर्गत या नेत्यांवर तात्काळ अपात्रतेची कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली होती.