राजगुरुनगर (प्रतिनिधी) – खेड पंचायत समितीचे सभापती भगवान पोखरकर यांच्यावरील अविश्वास ठरावावर बुधवारी (दि.१८) पुन्हा मतदान होणार असून शिवसेनेच्या सदस्यांना अविश्वासाच्या विशेष सभेस हजर राहून अविश्वास ठरावाच्या विरुद्ध मतदान करावे असा पक्षादेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेनेचे सचिव खासदार अनिल देसाई यांनी दिले आहेत.यामुळे पंचायत समितीचे शिवसेनेचे सदस्य ठरावाच्या बाजूने जाणार की विरुद्ध बाजूने जाणार या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
शिवसेनेचे खेड पंचायत समितीचे सभापती भगवान पोखरकर यांच्यावरील अविश्वास दि. ३१ मे रोजी विशेष सभा घेत अकरा सदस्यांनी आणला होता. यामध्ये शिवसेनेचे सहा सदस्य एक सदस्य तथा उपसभापती भाजपचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे चार अशा अकरा सदस्यांनी सभापती पोखरकर यांच्यावर अविश्वास ठराव आणला होता.
यामुळे तालुक्यातील राजकीय नाट्य चांगलेच रंगले होते. राज्यात महाआघाडी आहे मात्र खेड तालुक्यात या महाघाडीची बिघाडी होत सवतीचे राजकारण सुरु आहे. अविश्वास ठराव आणि त्यानंतर घडलेल्या महा राजकीय नात्याने जिल्ह्यासह राज्यभर चर्चा झाली.
अविश्वास ठरावाच्या निर्णयाला आव्हान देत सभापती पोखरकर, पंचायत समिती सदस्य कॉंग्रेसचे अमोल पवार व शिवसेनेच्या ज्योती अरगडे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. २७ जुलै रोजी मुंबई उच्च न्यायालयात निर्णय पारित करून उपविभागीय अधिकारी खेड यांनी दि.३१ मे रोजी घेतलेल्या अविश्वास ठरावाच्या विशेष सभेचे कामकाज रद्द केले व जिल्हाधिकारी पुणे यांनी विशेष सभा लावण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी पुणे यांनी सभापती भगवान पोखरकर यांच्यावरील उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार येत्या बुधवार दि. १८ रोजी अविश्वास ठरावाची विशेष सभा आयोजित केली आहे.
शिवसेनेच्याच सहा सदस्यांनी बंड करीत सभापती भगवान पोखरकर यांच्यावर अविश्वास ठराव दाखल केल्यानंतर सहलीवर गेलेल्या या सदस्यांमध्ये व पोखरकर यांच्या समर्थकांमध्ये पुण्याजवळ एका रिसॉर्टवर हाणामाऱ्या झाल्या होत्या. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक झाली होती. ते अजूनही अटकेत आहेत.
दि. १८ ऑगष्ट रोजी सभापती पोखरकर यांच्यावरील अविश्वास ठराव विशेष सभा आयोजित केल्याने पुन्हा तालुक्यातील राजकीय चर्चेला रंग आला होता. आता शिवसेनेत बंडखोरी केलेल्या सदस्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेचे सचिव खासदार अनिल देसाई यांनी पक्षाच्या सर्व सदस्यांना सभापती भगवान पोखरकर यांच्यावरील अविश्वास ठरावाच्या विशेष सभेला हजर राहण्याचे व अविश्वास ठरावाच्या विरुद्ध मतदान करावे असा पक्षादेश काढण्यात आला आहे त्यामुळे सहलीवर गेलेल्या पाच शिवसेनेच्या सदस्यांची भूमिका काय राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकीकडे पक्षाने व्हीप काढला आहे तर दुसरीकडे शिवसेनेने शिवसेनेचे सभापती पोखरकर यांच्यावर अविश्वास ठराव आणला म्हणून सदस्यत्व रद्द करण्याचे प्रस्ताव पाठवले असल्याने या सदस्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.
एकंदरीत सभापती पोखरकर यांच्यावरील अविश्वास ठराव मंजूर होणार कि बारगळणार? अविश्वास ठराव मंजूर झाला तर पुढील सभापती कोण होणार? खेडचे मदार दिलीप मोहिते पाटील, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या भूमिका काय असणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील कोणत्या पक्षाची खेळी सरस ठरणार याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे.