पालघर- पालघर लोकसभा मतदारसंघात महायुतीने भाजप नेते हेमंत विष्णू सावरा यांना उमेदवारी दिली आहे. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना खासदार राजेंद्र गावित चांगलेच नाराज झालेत.
पालघर लोकसभेसाठी मला तिकीट नाकारण हे माझ्या दृष्टिकोनातून अत्यंत धक्कादायक व स्वतःसाठी दुःखद गोष्ट आहे, असे त्यांनी म्हटले आहे. पण याचवेळी त्यांनी महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्याचा निर्धारही बोलून दाखवला आहे.
भाजपने गुरुवारी रात्री माजी मंत्री विष्णू सावरा यांचे सुपुत्र हेमंत सावरा यांना पालघर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याची घोषणा केली. पालघर लोकसभेसाठी 5 व्या टप्प्यात निवडणूक होणार आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या 1 दिवस अगोदर ही उमेदवारी जाहीर करण्यात आली.
गावित म्हणाले की, पालघर लोकसभा निवडणुकीसाठी तिकीट नाकारणे हा माझ्यासाठी अत्यंत धक्कादायक व स्वतःसाठी दुःखद निर्णय आहे. या निर्णयामुळे माझ्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम व प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे.
कार्यकर्त्यांचे मला फोन येत असून ते वेगवेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया देत आहेत. पण माझे तिकीट कापण्यात आले तरी मी महायुतीचा धर्म पाळेन. मी महायुतीच्या उमेदवाराविषयी कार्यकर्त्यांमध्ये असलेली नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करेन. आम्ही सर्वजण महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्याचा प्रयत्न करू, असे राजेंद्र गावित म्हणाले.
उल्लेखनीय बाब म्हणजे राजेंद्र गावित पूर्वी भाजपमध्ये होते. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पालघरची जागा शिवसेनेच्या वाट्याला गेली होती. त्यामुळे ते शिवसेनेच्या तिकिटावर लढले होते.
त्यात त्यांचा विजयही झाला होता. यावेळी त्यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता होती. पण भाजपने या जागेसाठी आग्रह धरल्यामुळे त्यांची उमेदवारी कापली गेली. यामुळे त्यांची घोर निराशा झाली आहे.
कोण आहेत हेमंत सावरा?
पालघर लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जमतासाठी राखीव आहे. डॉक्टर हेमंत सावरा ऑर्थोपेडिक सर्जन असून, वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. सामाजिक संस्थांच्या माध्यमातून त्यांचे समाजकार्य सुरू आहे.
विष्णू सावरा यांच्या निधनानंतर ते राजकारणात सक्रिय झाले. त्यांनी 2019 मध्ये त्यांनी विक्रमगड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.