पाकिस्तान सरकारच्या मालकीची पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स (पीआयए) ही प्रवासी विमान वाहतूक करणारी कंपनी सध्या एका विचित्र समस्येला सामोरे जात आहे. पाकिस्तान एअरलाइन्सचे अनेक कर्मचारी कॅनडात गेल्यावर गायब होण्याचे प्रकार गेल्या काही दिवसात वाढलेले आहेत. 2019 पासून असे प्रकार घडत असून गेल्या काही महिन्यांमध्ये त्यात वाढ झाल्याचे विमान वाहतुकी संदर्भातील बातम्या देणाऱ्या सिम्पल फ्लाईंग या संकेतस्थळाने दिली आहे.
नुकतीच मरियम रझा ही पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सची कर्मचारी टोरंटोमध्ये पीआयएचे विमान उतरल्यानंतर गायब झालेली आहे. टोरंटोमध्ये विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांची ज्या हॉटेलमध्ये सोय करण्यात आली होती त्याठिकाणी तिने थँक्यू पीआयए असे लिहून ठेवलेली चिठ्ठी सापडलेली आहे. याआधी जानेवारी 2024 मध्ये पीआयए ची आणखी एक फ्लाईट अटेंडंट फैजा मुख्तार ही जानेवारी 2024 मध्ये अशीच गायब झाल्याचे वृत्त डॉन या पाकिस्तानातील वृत्तपत्राने दिले होते. सध्या पीआयए ही आर्थिक समस्यांनी ग्रस्त असून त्यातच कर्मचारी अशा पद्धतीने गायब होत असल्याने कंपनीच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
सध्या पाकिस्तान हा देशच मोठ्या आर्थिक संकटातून जात आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी कडून घेण्यात येत असलेल्या कर्जावर पाकिस्तानची गुजराण चालू आहे. त्याखेरीज 2023 पासून पाकिस्तानातील अनेक कुशल व्यावसायिक देश सोडून जात असल्याच्या घटना घडत आहेत. पाकिस्तानातील प्रशिक्षित फ्लाईट अटेंडन्स कॅनडा आणि अन्य देशांमध्ये आश्रय घेत असल्याच्या घटना 2018 पासून घडू लागल्या आहेत असे द मीडिया लाईन या संकेतस्थळाने म्हटले आहे.
2023 मध्ये पीआयए च्या जवळपास सात फ्लाईट अटेंडन्स कॅनडात विमान उतरल्यानंतर गायब झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. लाहोरहून डिसेंबर 2023 मध्ये निघालेले विमान टोरंटो विमानतळावर उतरल्यानंतर पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सचे दोन केबिन क्रू गायब झाले. या संदर्भात बोलताना पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइनचे प्रवक्ते अब्दुल्ला हफीज खान यांनी या सगळ्या घटनांचा ठपका कॅनडाच्या अतिउदार आश्रय धोरणाला आणि आश्रय देण्याच्या कार्यक्रमावर ठेवला आहे. दुसरीकडे पीआयएचे डळमळीत भवितव्य आणि कमी वेतनामुळे अनेक क्रू मेंबर्स कॅनडात विमान उतरल्यानंतर गायब होण्याचा पर्याय स्वीकारत आहेत. आर्थिक चणचणीत सापडलेल्या पीआयएचे खाजगीकरण करण्यास पाकिस्तान सरकारने मान्यता दिली आहे. मात्र तोट्यात चालणाऱ्या या एअरलाइन्सचे भवितव्य अद्याप तरी डळमळीत आणि अनिश्चित असेच आहे.