पुणे – नुकतीच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात उभी फूट पडून अजित पवार राष्ट्रवादीच्या बहुसंख्य आमदारांना घेऊन भाजप-शिंदे गटाच्या युतीत सामील झाले असून याचे पडसाद मतदारसंघात उमटणार आहेत. तर ‘ज्यांनी माझ्या विचारांशी द्रोह केला. ज्यांच्याशी माझा आता वैचारिक मतभेद आहे. त्यांनी माझा फोटो वापरू नये.’ अशा शब्दात शरद पवार यांनी अजित पवारांच्या गटाला खडसावून सांगितलं. यानंतरही शरद पवार यांच्या फोटो अजित पवार यांच्या गटात सामील झालेल्या नेत्यांनी लावला आहे.
दरम्यान, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी अजित पवारांच्या गटात गेलेल्या नंतर त्यांचं अजिबात न ऐकता शरद पवारांचा फोटो वापरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवारांनी आपला खुंटा अधिक बळकट करण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यासाठी आज आपल्या गटाची एक बैठक आयोजित केली आहे. ज्यासाठी राज्यभरातील सर्व नेते आणि पदाधिकाऱ्यांना येण्याचं आवाहन केलं आहे.