पाटणच्या पारंपरिक लढतीत शंभूराज देसाई की सत्यजित पाटणकर?

सूर्यकांत पाटणकर

पाटण – पाटण तालुक्‍यात एकमेकांचे राजकीय प्रतिस्पर्धी असणाऱ्या देसाई-पाटणकर गटांमध्येच विधानसभा निवडणुकीचा सामना रंगला. निवडणुकीत आरोप-प्रत्यारोपामुळे नेत्यांच्या जाहीर सभाही गाजल्या. राष्ट्रवादीचे उमेदवार सत्यजित पाटणकर यांच्याकडून आमदार शंभूराज देसाई यांच्या अठराशे कोटींच्या विकास कामांचा पंचनामा करण्यात आला.तर शंभूराज देसाई यांनी अठराचे कोटींचा विकास बोटाला धरुन दाखवण्याची हिंमत असल्याचे सांगितले. त्यामुळे या निवडणुकीत अठराशे कोटींचा विकास खरा की अठराशे कोटींचा पंचनामा हे येथे गुरुवारी स्पष्ट होणार आहे.

पाटण तालुक्‍याचे राजकारण नेहमीच देसाई-पाटणकर गटांमध्ये फिरत राहिले आहे. विधानसभा निवडणुकीसाठी देसाई -पाटणकर यांच्यामध्ये खरी लढत झाली आहे. आमदार देसाई यांनी गेल्या पाच वर्षात पाटण तालुक्‍यात विकासकामांचा डोंगर उभा केला असून आठराशे कोटींचा विकास केला असा दावा केला आहे. तर राष्ट्रवादीकडून दुसऱ्यांदा निवडणूक लढवणारे सत्यजित पाटणकर यांनी आमदार शंभूराज देसाई यांच्या अठराशे कोटीचा पंचनामा केला आहे. त्यामुळे 2019 च्या निवडणुकीत शंभूराज देसाई यांच्या आठराशे कोटींचा विकास व राष्ट्रवादीचे उमेदवार सत्यजित पाटणकर यांनी शंभूराज देसाई यांच्या विकास कामांचा पंचनामा या मुद्यांवरही निवडणूक रंगतदार झाली.

प्रचाराच्या रणधुमाळीत नेत्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. अगदी राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार यांनीही अप्रत्यक्ष आमदार शंभूराज देसाई यांच्या आजारपणावर जाहीर सभेत टीका केली. त्यामुळे शंभूराज देसाई यांनीही पाटण येथील सांगता सभेत खासदार पवार साहेबांचा समाचार घेतला. आमदार शंभूराज देसाई यांना कधी विकासकामांवर तर कधी त्यांच्या आजारपणावर टीका करुन राष्ट्रवादीचे उमेदवार सत्यजित पाटणकर यांनी शरसंधान साधले. मात्र शंभूराज देसाई यांनी त्याला जोरदार प्रत्युत्तर देत आजारपण कोणाला सांगून येत नाही, आजारपण असले तरीही लोकांच्या सेवेसाठी तत्पर असतो. हे पूर परिस्थितीत पाटण तालुक्‍यातील जनतेला कळाले आहे असे त्यांनी सांगितले.

विधानसभा निवडणुकीसाठी शंभूराज देसाई यांच्यासोबत सेनेचे नरेंद्र पाटील, जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील, माजी सभापती यु. टी. माने यांच्यासह जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर हे या निवडणुकीत आमदार देसाई यांच्यासोबत दिसले. त्यामुळे ढेबेवाडी विभाग तसेच पाटण विभागातील काही गावात देसाई यांना या नेत्यांचा फायदा होणार हे निश्‍चित मानले जात आहे. तर राष्ट्रवादीचे उमेदवार सत्यजित पाटणकर यांच्यासोबत कॉंग्रेसचे हिंदूराव पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अर्थ शिक्षण सभापती संजय देसाई, पंचायत समितीचे माजी उपसभापती रमेश मोरे हे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या व्यासपीठावर दिसल्याने याचा फायदाही सत्यजित पाटणकर यांना होणार आहे.

सध्या तालुक्‍यात विधानसभा निवडणुकांसाठी मतदान झाले असून उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे. गुरुवारी 24 रोजी निकाल स्पष्ट होणार आहे. मात्र निकालाच्या अगोदर देसाई पाटणकर यांची आकडेमोड सुरु आहे. कोणत्या भागात किती मतदान झाले. स्वतःला किती मतदान मिळाले, याची आकडेवारी कार्यकर्त्यांकडून घेण्याचे काम देसाई-पाटणकर यांच्याकडून चालू आहे. सुपने, तांबवे या मतदारसंघात कोणाला अधिक मताधिक्‍य मिळते, यावर बरेचसे अवलंबून आहे. मात्र आमदार देसाई यांनी या भागात विकासकामे केली नसल्याने त्यांचे या विभागातील मतदान घटेल, असा आत्मविश्वास राष्ट्रवादीला आहे.

तर तालुक्‍याच्या दक्षिण भागात कुंभारगाव, काळगाव, ढेबेवाडी विभागात आमदार शंभूराज देसाई यांना जास्त मताधिक्‍क्‍य मिळेल, असा विश्वास आहे. तर पाटण, कोयना या मतदार संघात पाटणकर यांच्या बरोबरीने मतदान मिळेल. तारळे, चाफळ या भागात आमदार देसाई यांना मताधिक्‍क्‍य मिळेल असा दावा केला जात आहे. मात्र येणाऱ्या 24 तारखेला निकाल स्पष्ट होऊन कोण बाजी मारणार हे स्पष्ट होणार आहे. एकंदरीत 2019 च्या निवडणुकीत आठराशे कोटीचा विकास व आठराशे कोटीचा पंचनामा हा विषय सर्वाधिक चर्चेचा ठरला आहे. त्यामुळे निकाला दिवशी विकास कामांचा पंचनामा खरा की विकास खरा याचा फैसला होणार आहे.

पाटलांचा पाटणकरांना फायदा
विधानसभा निवडणुकीबरोबरच सातारा लोकसभेची पोटनिवडणूक घेण्यात आली. सातारा लोकसभा निवडणुकीसाठी रणांगणात असणारे उदयनराजे भोसले यांच्या विरोधात श्रीनिवास पाटील हे पाटण तालुक्‍यातील असल्याने राष्ट्रवादीचे उमेदवार सत्यजित पाटणकर यांना याचा फायदा होणार असल्याचे बोलले जात आहे. गतवेळी देसाई यांचे अठरा हजाराचे असणारे लीड पाटील यांच्यामुळे कमी होऊन तसेच हिंदूराव पाटील यांना मिळालेले सात हजार मताधिक्‍य यावेळी कमी होऊन सत्यजित पाटणकर यांना त्याचा फायदा होईल असे बोलले जात आहे.

“एकला चलो रे’ ची शंभूराजांची भूमिका
आमदार शंभूराज देसाई यांनी विधानसभेची निवडणूक एकला चलो रे अशीच लढली. सत्ताधारी पक्षाचे आमदार असतानाही त्यांनी मंत्रिमंडळातील एकाही मंत्र्याची सभा तालुक्‍यात घेतली नाही. भाजप-सेनेची युती असताना तसेच मुख्यमंत्री यांच्याशी दोस्ती असताना आमदार देसाई मुख्यमंत्र्यांना पाटण तालुक्‍यात आणू शकले असते. मात्र अठराशे कोटींच्या कामावर त्यांचा असणारा विश्वास यामुळेच एकला चलो रे ची भूमिका आमदार देसाई यांनी या विधानसभा निवडणुकीत घेतली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)