इस्लामाबाद – पाकिस्तानातील शाहबाज शरिफ सरकारशी संबंधित एका नव्या घडामोडीत त्या देशाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री इसाक दार यांची उपपंतप्रधान पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. दार हे काश्मीरी वंशाचे असून त्यांच्याकडे महत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. (Pakistan’s Foreign Minister Ishaq Dar appointed as Deputy Prime Minister)
पाकिस्तानातील जियो न्यूजने दिलेल्या बातमीनुसार सरकारकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पंतप्रधान शाहबाज शरिफ यांच्या शिफारसीनुसार राष्ट्रपती आसिफ अलि झरदारी यांनी दार यांची उपपंतप्रधान म्हणून नियुक्ती केली आहे. विशेष म्हणजे जागतिक आर्थिक परिषदेत सहभागी होण्यासाठी शाहबाज शरिफ सौदी अरब येथे गेले असतानाच दार यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली आहे.
मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पाकिस्तानातील नव्या मंत्रिमंडळात १९ जणांचा समावेश करण्यात आला होता. तेंव्हापासून दार या मंत्रिमंडळाचे सदस्य आहेत. आर्थिक अडचणीत सापडलेला पाकिस्तान जगभरात मदतीसाठी प्रयत्नशील असताना दार यांच्याकडे ही महत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दार हे पाकिस्तान मुस्लिम लिग- नवाज पक्षाचे वरिष्ठ नेते असून माजी पंतप्रधान नवाज शरिफ यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात. यापूर्वी चार वेळा त्यांनी पाकिस्तानचे अर्थ मंत्रालय सांभाळले आहे. ते मूळचे काश्मीरचे असून पेशाने चार्टर्ड अकाउंटंट आहेत.
पाकिस्तानचे भारतासोबतच अन्य शेजारी राष्ट अफगाणिस्तानसोबतचेही संबंध बिघडले आहेत. अशावेळी परराष्ट्र मंत्रालयाचा फारसा अनुभव नसलेल्या दार यांना परराष्ट्र मंत्री करण्यात आल्यामुळे पाकिस्तानात बरीच उलटसुलट चर्चा झाली होती. आता त्यांच्याकडे नवीन जबाबदारी देण्यात आली असल्यामुळे या चर्चा थांबतील अशी शक्यता वर्तवली जाते आहे.