#प्लॅस्टिक बंदी : अडीच हजार दुकानदार, नागरिकांवर कारवाई

बंदी असलेल्या प्लॅस्टिकचा वापर

पुणे – शहरात बंदी असतानाही सिंगल युज प्लॅस्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे पुन्हा समोर आले आहे. महापालिकेकडून हे प्लॅस्टिक वापरणारे नागरिक तसेच विक्री करणारे व्यावसायिक अशा सुमारे 2,771 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 24 लाख 960 रुपयांचा दंड वसूल केला आहे. त्याचशिवाय, शहरातील बहुतांश दुकाने तसेच व्यापारी पेठांमध्ये अद्यापही मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक विक्री सुरू असून त्याकडे पालिकेचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे महापालिका केवळ दिखाव्यापुरती कारवाई करते का? असा प्रश्‍न नागरिकांमधून उपस्थित होत आहे.

महापालिकेकडून गेल्या महिन्याभरापासून सिंगल युज प्लॅस्टिक वापरास पूर्णतः निर्बंध आणण्यात आले असून त्या अनुषंगाने कारवाई सुरू केली आहे. या कारवाईमध्ये प्लॅस्टिकचे आकशकंदील, नॉन ओव्हन बॅग, 50 मायक्रोन खालील प्लॅस्टिकच्या पिशव्या, चमचे आदींवर कारवाई करण्यात येत आहे. प्लॅस्टिकवर कारवाई करण्यासाठी ठिकठिकाणी दुकानांची तपासणी करण्यात येत असून त्यांच्याकडून प्लॅस्टिक जप्त करण्यात येत आहे. तसेच, दंडात्मक कारवाईदेखील करण्यात येत आहे.

त्याचप्रमाणे, ठिकठिकाणी रस्त्यांवर व कचरा गोळा केल्यानंतर त्यामध्ये सिंगल युज प्लॅस्टिक आढळल्यास संबंधित नागरिकादेखील दंडात्मक कारवाई होणार आहे. सिंगल युज प्लॅस्टिक वापरावर बंदी असल्याने शहरामध्ये कारवाईची तीव्रता गेल्या काही दिवसांत पालिकेकडून वाढविण्यात आली आहे. त्यांतर्गत आतापर्यंत 2,771 दुकानदार व नागरिक यांच्याकडून 24 लाख 94 हजार 960 दंड वसून केला असल्याचे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून कळविण्यात आले.

बंदी असूनही विक्री होतेच कशी…
महापालिकेकडून शहरात मार्च 2019 पासून बंदी असलेल्या प्लॅस्टिकवर कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत जवळपास 50 टन प्लॅस्टिक पिशव्या महापालिकेने जप्त केल्या आहेत. तसेच, व्यावसायिक तसेच नागरिकांमध्येही मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे. असे असतानाही शहरात बंदी असलेल्या प्लॅस्टिकच्या साहित्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. पालिकेकडून केवळ छोटे दुकानदार तसेच रस्त्यांवर दिसणाऱ्या नागरिकांवर कारवाई केली जात आहे. मात्र, हे साहित्य विक्रीसाठी आणणाऱ्या तसेच त्याचे होलसेल विक्रेत्यांची माहिती असूनही अशा व्यावसायिकांना मात्र काहीच केले जात नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.