रांची – तुरुंगात असलेले झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना या ही आता निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या असून त्यांनी सोमवारी राज्यातील गांडे विधानसभा मतदारसंघातून अर्ज दाखल केला.या मतदार संघात विधानसभेची पोटनिवडणूक लोकसभेबरोबरच होत आहे. या जागेसाठी २० मे रोजी मतदान होत आहे. (Jharkhand: Kalpana Soren’s move towards Chief Minister)
झारखंड मुक्ती मोर्चाचे आमदार सर्फराज अहमद यांच्या राजीनाम्यामुळे गिरिडीह जिल्ह्यातील ही जागा रिक्त झाली होती.४८ वर्षीय कल्पना सोरेन या सामाजिक कार्यकर्त्या असून त्यांनी स्वताच्या स्वयंसेवी संघटनेमार्फत मोठे सामाजिक काम उभे केले आहे. इंडिया आघाडीच्या अलिकडेच झालेल्या सभांमध्ये त्यांनी जोरदार भाषणे केल्याने त्या चर्चेत आल्या होत्या.
कल्पना या उच्चशिक्षित आहेत. त्यांनी एमटेक आणि एमबीए पदवी मिळवली आहे. ओडिशाच्या मयूरभंज जिल्ह्यातील बारीपाडा येथून त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले आणि भुवनेश्वरमधील स्वतंत्र संस्थांमधून अभियांत्रिकी आणि एमबीए पदवी प्राप्त केली.हेमंत सोरेन यांना अंमलबजावणी संचालनालयाने ३१ जानेवारी रोजी कथित जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली आहे, तेव्हांपासून ते तुरूंगात आहेत.
कल्पना यांच्याकडे आता हेमंत यांचे राजकीय उत्तराधिकारी म्हणूनच पाहिले जाते आहे. मध्ंतरी मुख्यमंत्रिपदाच्या नावासाठीही कल्पना यांची चर्चा होती. तथापि, काही कारणास्तव हे पद चंपाई सोरेन यांच्याकडे सोपवण्यात आले. आता कदाचित विधानसभेवर निवडून आल्यानंतर कल्पना यांची ताजपोशी केली जाऊ शकते.