पुणे – “समाजाची सेवा करायची, हीच खरी वेळ आहे. अशा शब्दांत पुणे पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी पोलीस कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे. पोलिसांच्या कार्याची दखल प्रसारमाध्यमांनी घेतली असून टाळेबंदीत पोलीस दलाचे काम प्रशंसनीय आहे,’ असे डॉ. वेंकटेशम यांनी सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.
“पोलीस दलात दाखल होताना सरधोपट उत्तर दिले जाते की, मी समाजाची सेवा करणार आहे. पोलीस नेहमी रस्त्यावर काम करतो. टाळेबंदी, संचारबंदीच्या काळात पोलीस दलाचे कार्य आणि त्याग नागरिकांना दिसत असून त्याचे कौतुक होत आहे. आपण सगळे एकसंघ होऊन कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडूया. कर्तव्यावरील प्रत्येकाने स्वत:ची तसेच कुटुंबीयांची काळजी घेणे गरजेचे आहे,’ असे डॉ. वेंकटेशम यांनी पत्रात म्हटले आहे.