हडपसर – ससाणे नगर रस्त्यावर ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी सिमेंट कॉक्रीटीकरण केलेला चांगला रस्ता खोदण्यात आला आहे. खोदलेल्या रस्त्यावर वाहतूक संबंधित सूचना लावण्यात आलेल्या नाहीत.त्यामुळे वाहनचालकांची मोठी गैरसोय होत आहे. खोदून ठेवलेल्या रस्त्याच्या अंदाज येत नसल्याने वाहने अडकून अपघात घडत आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाने येथील काम त्वरीत पूर्ण करून रस्ता पूर्ववत करावा, नाही तर शिवसेनेच्या वतीने महापालिका अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासण्यात येईल, असा इशारा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख उल्हास तुपे यांनी दिला आहे.
ससाणेनगर येथे काळे कॉलनी ,काळूबाई मंदिरासमोर ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम सुरू आहे. काम झालेल्या भागात माती-मुरूम टाकून ठेवण्यात आला आहे. त्याठिकाणी वाहनांची वर्दळ सुरू आहे. अनेकदा असलेल्या खड्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे वाहने अडकून अपघात घडत आहेत. याशिवाय वाहतूक कोंडी ही होत आहे.
खोदून अर्धवट ठेवलेल्या कामाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची सूचना लावण्यात आली नाही. त्यामुळे शनिवारी त्यात डंपर अडकून अपघात झाला आहे.अशीच परिस्थिती मगरपट्टा रस्त्यावर आहे.येथेही लाइनसाठी रस्ता खोदला आहे.दोन्हीही ठिकाणी महापालिका प्रशासन निष्काळजीपणे काम करत आहे.
महापालिका प्रशासन हे धीम्मपणे काम करत असून त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. कोणत्याही प्रकारचे सूचना फलक नाहीत. कामाला गती नाही.झालेल्या कामाच्या ठिकाणी लगेचच डांबरी किंवा सिमेंट कॉक्रीटीकरण केले जात नाही. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न केले जात नाहीत.
त्यामुळे सध्या ससाणेनगर रस्ता आणि मगरपट्टा रस्ता याठिकाणी महापालिका प्रशासनाची कृती किती लाजीरवाणी आहे. हेच लक्षात येते आहे. दोन्ही ठिकाणी काम तात्काळ पूर्ण केले नाही.तर संबंधित अधिकारी वर्गाला काळे फासल्याशिवाय पर्याय नाही.
उल्हास तुपे जिल्हा प्रमुख- शिवसेना