Rules Change 01 May 2024| आज 1 मे पासून अनेक गोष्टींमध्ये बदल झाला आहे. या बदललेल्या नियमांमुळे काही ठिकाणी सामान्य नागरिकांच्या खिशाला झळ बसू शकते. गॅस सिलिंडरच्या किमतीपासून ते बँकेच्या व्यवहारात काही महत्त्वाचे नियम बदलणार आहेत. आजपासून क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांवरील बोजा वाढणार आहे. तर निवडणुकांच्या काळात व्यावसायिक LPG सिलेंडरची किंमत कमी करण्यात आली आहे.
येस बँकेच्या नियमात बदल
येस बँक आणि आयडीएफसी फर्स्ट बँकेने जाहीर केले आहे की 1 मे पासून क्रेडिट कार्डद्वारे युटिलिटी बिले भरण्यासाठी ग्राहकांना 1 टक्के अतिरिक्त शुल्क भरावे लागेल. येस बँकेसाठी 15,000 रुपये आणि IDFC फर्स्ट बँकेसाठी 20,000 रुपये विनामूल्य पेमेंटची मर्यादा आहे. या अंतर्गत, बचत खात्याचा प्रो मॅक्स MAB 50,000 रुपये असेल, ज्यावर जास्तीत जास्त 1,000 रुपये शुल्क आकारले जाईल.
सेव्हिंग अकाउंट प्रो प्लस, येस एसेन्स एसए आणि येस रिस्पेक्ट एसए मधील किमान शिल्लक 25,000 रुपये असेल आणि या खात्यावर 750 रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे. बचत खाते प्रो मध्ये किमान 10,000 रुपये शिल्लक ठेवावे लागतील आणि त्याचे शुल्क देखील कमाल 750 रुपये असेल. बचत मूल्यासाठी 5000 रुपयांची मर्यादा आहे आणि कमाल 500 रुपये शुल्क आकारले जाईल. नियमाचे उल्लंघन केल्यास दंड शुल्क आकारले जाईल.
आयडीएफसी बँक नियमात बदल
आयडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डच्या मदतीने तुम्ही बील देणं महागणार आहे. फोन बील, वीजबील, इंटरनेट बील, केबल सर्व्हिस, पाणीबील आदी बील तुम्ही क्रेडिट कार्डने देत असाल तर तुम्हाला त्यासाठी अतिरिक्त शुल्क मोजावे लागेल. फस्ट प्रायव्हेट क्रेडिट कार्ड, एलआयसी क्लासिक क्रेडिट कार्ड, एलआयसी सिलेक्ट क्रेडिट कार्ड यासाठी मात्र हा नियम लागू नसेल.
आयसीआयसीआय बँकेच्या नियमात बदल
आयसीआयसीआय बँकेच्या नव्या नियमानुसार डेबिट कार्डसाठी शहरी ग्राहकांना प्रतिवर्ष 200 रुपये तर ग्रामीण भागातील ग्राहकांना प्रतिवर्षी 99 रुपये द्यावे लागणार आहेत. 1 मे रोजीपासून पासबुकच्या सेवेसाठीही काही शुल्क द्यावे लागेल.
चेक बुकचे पहिले 25 चेक हे निशुक्ल असतील. याशिवाय बँकेने चेकबुकच्या नियमातही बदल केले असून 1 मे नंतर 25 पानांचे चेकबुक देण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नसून, त्यानंतर प्रत्येक पानासाठी 4 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. एवढेच नाही तर IMPS व्यवहारांवर 2.50 ते 15 रुपये शुल्क आकारले जाईल.
मे महिन्यात 14 दिवस बँकां बंद
मे 2024 मध्ये बँकांना बंपर सुट्ट्या आहेत. संपूर्ण महिन्यात एकूण 14 दिवस बँकांमध्ये कोणतेही काम होणार नाही. बँकेला सुट्टी असेल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या बँक सुट्टीच्या यादीनुसार, मे महिन्यात येणाऱ्या या सुट्ट्यांमध्ये अक्षय्य तृतीया, महाराष्ट्र दिन, रवींद्रनाथ टागोर जयंती आणि इतर सुट्ट्यांचा समावेश आहे. यात दुसऱ्या आणि चौथ्या शनिवार व्यतिरिक्त या सुट्यांमध्ये रविवारच्या साप्ताहिक सुट्टीचाही समावेश आहे.
व्यावसायिक LPG सिलेंडरची किंमत कमी
दर महिन्याच्या पहिल्या दिवशी तेल कंपन्या 14 किलो आणि 19 किलो एलपीजी सिलिंडरचे दर ठरवतात. निवडणुकीच्या वातावरणात सरकारी तेल बाजारातील कंपन्यांनी सिलिंडरचे दर कमी केले आहेत. एलपीजी सिलिंडरची नवी किंमत आजपासून म्हणजेच 1 मेपासून देशभरात लागू झाली आहे. त्यानुसार 19 किलोच्या व्यावसायिक LPG सिलेंडरची किंमत 19 रुपयांनी कमी केली आहे. मात्र, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही.