मराठा समाजाने आळेफाटा येथे नोंदवला निषेध
बेल्हे – उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हे जुन्नर तालुक्याच्या दौर्यावरती गुरुवारी (दि. 25) आले होते. यावेळी आळेफाटा येथे अजित पवारांच्या ताफ्याला मराठा समाजाने काळे झेंडे दाखवत निषेध नोंदवला.
मराठा आंदोलक अजित पवार यांना काळे झेंडे दाखवण्याची शक्यता यापूर्वीच वर्तवण्यात आली होती. त्यामुळे, सभेच्या पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात होता. मात्र आळेफाटा चौकात अजित पवार यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, मराठ्यांना आरक्षण मिळाले, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचा, अजित पवार मुर्दाबाद, अजित पवारांचा धिक्कार असो अशा घोषणा देण्यात आल्या.
यावेळी पोलिसांनी उद्धव ठाकरे गटाचे तालुकाध्यक्ष माऊली खंडागळे, शरद पवार गटाचे सुरज वाजगे यांच्यासह इतर सुधीर घोलप, अनिल गावडे, योगेश वाडेकर यांना ताब्यात घेतले आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे 26 तारखेला मराठा समाजासोबत मुंबईत पोहोचणार आहे.
मुंबईच्या गल्ली गल्लीत मराठा समाज असणार आहे. आम्हाला फक्त आरक्षण मिळाले पाहिजे ते कुठेही दिले तरी चालेल. मग लोणावळ्यात, नवी मुंबईत किंवा आझाद मैदानात दिले तरी चालेल, असे मनोज जरांगे यांचे म्हणणे आहे.