सादतपूर येथील घटना
संगमनेर – तालुक्यातील आश्वी परिसरातील सादतपूर येथील गोरे वस्तीवर नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात पाच वर्षाचा हर्षल राहुल गोरे गंभीर जखमी झाला. ही घटना सायंकाळी चार ते साडेचारच्या दरम्यान घडली. घराकडून चुलतेच्या घराकडे जात असताना रोडलगत गिन्नी गवतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने हर्षलवर झडप घालून त्याला गिन्नी गवतात ओढून नेले असता त्याचा भाऊ वाघ वाघ ओरडत घराकडे पळाला. हर्षलचे घरचे सर्व ओरडत गवताकडे पळाले असता बिबट्याने तिथून धूम ठोकली.जखमी हर्षल राहुल गोरे यास उपचारासाठी प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
लोणी येथील घटना ताजी असतानाच दहा दिवसाच्या अंतरावर नरभक्षक बिबट्याने आज सादतपू मध्ये पुन्हा पाच वर्षे बालकावर हल्ला करून त्याला ठार केले. दिवसाढवळ्या घडलेल्या घटनेमुळे सादतपूर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती वन विभागाला मिळताच वन विभागाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करण्याचे काम सुरू आहे.
गेल्या दहा दिवसांपासून वन विभागाने विविध ठिकाणी 15 पिंजरे लावले आहेत. पण आतापर्यंत या पिंजऱ्यामध्ये प्रवरानगर पाथरी रोडवरील थेटे वस्तीवर एकच बिबट्या पिंजऱ्यात कैद झाला आहे. वन विभागाच्या माध्यमातून लावलेल्या पिंजऱ्यांना बिबटे हुलकावणी देऊन लहान बालकावर हल्ला करत आहेत. नरभक्षक बिबट्या अजून किती बळी घेणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.