पुणे – राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये निवडणूक साक्षरता वाढावी, यासाठी विद्यापीठांना विद्याशाखानिहाय मतदार शिक्षण व निवडणूक साक्षरतेचे अभ्यासक्रम तयार करावे लागणार आहेत. त्यासाठी आवश्यक ते श्रेयांकही विद्यार्थ्यांना द्यावे लागणार आहेत. राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभागाने हा आदेश दिला आहे.
विद्यार्थ्यांमध्ये निवडणूक साक्षरता व्हावी, याकरीता केंद्रीय निवडणूक आयोग आणि केंद्रीय शिक्षण मंत्रालय यांच्यात नुकताच करार झाला. या सोबतच सर्व अकृषि विद्यापीठे, त्यासंलग्नित महाविद्यालये यांच्या स्तरावरुन योग्य ती कार्यवाही करावी लागणार आहे. निवडणूक साक्षरतेच्या अनुषंगाने अध्यापन करण्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षित करावे, युनिफाइड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सिस्टिम फॉर एज्युकेशन, ऑल इंडिया सर्व्हे फॉर हायर एज्युकेशन आणि अन्य माहितीच्या सहाय्याने १७ वर्षे पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची नोंद घ्यावी.
मतदार याद्यांच्या वार्षिक अवलोकनावेळी पात्र विद्यार्थ्यांना ऑनलाइन मतदार नोंदणी करण्याच्या अनुषंगाने संस्थात्मक फ्रेमवर्क तयार करावे. त्याद्वारे वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांस निवडणूक आयोग मतदान ओळखपत्र देऊ शकणार आहे.
नव्या निर्णयाची उद्दिष्ट्ये
– भावी मतदारांना देशाच्या निवडणूक व्यवस्थेचा परिचय करून देणे.
– मतदार म्हणून नोंदणी करण्याची आणि प्रत्येक निवडणुकीत उत्साहाने भाग घेण्याची इच्छा निर्माण करणे
– महाविद्यालयांमध्ये निवडणूक साक्षरता क्लब निर्माण करणे
– विविध उपक्रमांत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी क्रेडिट सिस्टिम तयार करावी लागणार आहे.