पिंपरी – कमी दाबाने, अपुरा पाणी पुरवठा होत असल्याच्या मुद्यावर महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने जाहीर स्पष्टीकरण दिले आहे. गृह प्रकल्पांमध्ये (सोसायटी) नळाद्वारे येणारे पाणी तळमजल्यावरील टाकीत साठवावे. त्या टाकीतील पाणी इलेक्ट्रीक मोटार किंवा पंपाद्वारे इमारतीवर बांधलेल्या टाकीत चढवून ते पाईपलाईनद्वारे प्रत्येक सदनिकेला पुरवठा करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून मार्फत सर्व नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो. पाणीपुरवठा हा पुरेसा दाबाने ग्राहकांच्या तळमजल्यावरील साठवण टाकीमध्ये (युजीडब्लूटी, बांधकाम केलेली किंवा सिन्टेक्स, प्लास्टिक टाकी) केले जाते. ग्राहकांचे वरील मजल्यावर किंवा किचनमध्ये पाणी पुरवठा करणे पालिकेला बंधनकारक नाही. नागरिकांनी तळमजल्यावरील असलेल्या टाकीवर इलेक्ट्रिकल मोट किंवा पंप लावून इमारतीवर बांधलेल्या साठवण टाकीत (ओएचडब्लूटी) पाणी साठवावे. ते पाणी इमारतीवरील टाकीतून पाईपधून पुरवठा करणे आवश्यक आहे.
ज्यांच्याकडे साठवण टाक्यांची व्यवस्था नाही, त्यांनी इमारतीच्या तळमजल्यावर व वरील मजल्यावर साठवण टाकी बांधून घ्यावी, किंवा साठवण टाकीची सोय करावी. इमारतीच्या कोणत्याही मजल्यावर पाणीपुरवठा करणे ही महापालिकेची जबाबदारी नाही, असे आवाहन पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता श्रीकांत सवणे यांनी केले आहे.