न्यायाधीश सागर मोहिते : पारगाव येथे मुलांना मार्गदर्शन
पारगाव शिंगवे – पोक्सो ( लहान मुलांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायदा 2012 ) या कायद्याने अल्पवयीन मुला- मुलींना संरक्षण दिले आहे. या कायद्याने मुलांना न्याय मिळण्यात मदत होईल, तसेच एखाद्याने विनाकारण खोटे गुन्हे दाखल केल्यास अशा व्यक्तीलाही या कायद्याने शिक्षा होते, असे प्रतिपादन घोडेगाव न्यायालयाचे न्यायाधीश सागर मोहिते यांनी केले.
पारगाव (ता. आंबेगाव) येथे संगमेश्वर विद्यालय व कै. बाबुराव गेनुजी ढोबळे महाविद्यालय व घोडेगाव बार असोसिएशन आणि घोडेगाव न्यायालयतर्फे तसेच पारगाव पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमानाने पॉस्को कायद्याविषयी मुलांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी घोडेगाव न्यायालयाचे न्यायाधीश सागर मोहिते बोलत होते.
या कार्यक्रमाला खेड विभागाचे पोलीस उपविभागीय अधिक सुदर्शन पाटील , पारगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे, घोडेगाव वकील संघाचे अध्यक्ष ॲड निलेश शेळके, बाजारसमितीचे संचालक व स्कूल कमिटीचे अध्यक्ष शिवाजीराव ढोबळे , सरपंच श्वेता ढोबळे, वकील संघाचे सदस्य नवनाथ निघोट, सुदाम मोरडे, शंकर धरम आणि चेतन पाटील प्राचार्य प्रकाश सुतार, कैलास येलभर उपस्थित होते.
न्यायाधीश सागर मोहिते म्हणाले , या कायद्याने पीडितना नुकसान भरपाई मिळत असते, या गुन्ह्यांची सुनावणी स्पेशल कोर्टात बंद दरवाज्याच्या आत चालते. या कायद्याअंतर्गत शिक्षा मोठी आहे. केलेल्या गुन्ह्यानुसार शिक्षा केली जाते. उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील म्हणाले की, शिक्षक व पालकांनी मुला-मुलींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
एखाद्या मुलींवर अन्याय झाल्यास पालकांना सांगणे गरजेचे आहे. मुला-मुलींना विश्वासात घेऊन त्यांच्यावर अन्याय झाला आहे, हे पोलिसांना सांगणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी वाईट मार्गाकडे न जाता चांगला अभ्यास करून मोठे अधिकारी व्हावे व देशाची सेवा करावी, असे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन वाघचौरे यांनी केले.