ajit pawar – राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यापासूनच शरद पवार आणि अजित पवार हे दिवाळीसाठी एकत्र येणार का? असा प्रश्न अनेकांना पडला होता. शनिवारी शरद पवार आणि अजित पवार हे एकमेकांना दिवाळीच्या निमित्ताने भेटले. अशात गोविंदबाग या शरद पवारांच्या बारामतीतल्या निवासस्थानी शरद पवार आणि इतर पवार कुटुंबीय जमले आहेत मात्र अजित पवार आलेले नाहीत.
शनिवारी शरद पवार आणि अजित पवार हे दिवाळीनिमित्त प्रतापराव पवार यांच्या निवासस्थानी एकमेकांना भेटले होते. अजित पवार यांच्या गोविंदबाग येथील अनुपस्थितीवर आता अजित पवार गटाचे हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हसन मुश्रीफ माध्यमांशी बोलतांना म्हणाले,’काल रात्री प्रतापराव पवार यांच्या घरी जेवायला ते एकत्र होते, राजकारण आणि नाती वेगळी, पवार कुटुंब एक आहे.. आज न आल्यामुळे प्रश्न उपस्थित करणं चुकीचे आहे. नाती गोती रक्त हे एकच असत ना…’ असेही मुश्रीफ म्हणाले.
तर अजित पवार अनुपस्थित असल्याने दुसऱ्याच चर्चांना उधाण आले आहे दरम्यान, या चर्चांवर आता सुप्रिया सुळेंनी स्पष्टीकरण दिले आहे. सुप्रिया सुळेंनी “मी आज महाराष्ट्राच्या मायबाप जनतेला दिवाळीच्या आणि पाडव्याच्या शुभेच्छा देते. सगळ्यांचं हे वर्ष सुख समृद्धीचं आणि आनंदाचं जावो अशी प्रार्थनाही करते. महाराष्ट्रावर महागाई, बेरोजगारी आणि दुष्काळाचं सावट आहे त्यातून आपली मुक्तता होऊ दे एवढीच पांडुरंगाचरणी प्रार्थना करते” असे म्हणत राज्यातल्या जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, पवार कुटुंबातील अनेक सदस्य देश विदेशात वास्तव्यास असतात. त्यांना एकत्र आणण्यासाठी हा कार्यक्रम दरवर्षी गोविंदबागेत साजरा करण्यात येतो.