Supriya Sule On Ajit Pawar : दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने आणि दिवाळीच्या निमित्ताने बारामतीतल्या गोविंदबाग या ठिकाणी पवार कुटुंब दरवर्षी एकत्र येत असतात. यंदाही सर्व पवार कुटुंबीय एकत्र आले आहेत. शनिवारी शरद पवार आणि अजित पवार हे एकमेकांना दिवाळीच्या निमित्ताने भेटले. अशात गोविंदबाग या शरद पवारांच्या बारामतीतल्या निवासस्थानी शरद पवार आणि इतर पवार कुटुंबीय जमले आहेत मात्र अजित पवार अनुपस्थित असल्याने दुसऱ्याच चर्चांना उधाण आले आहे दरम्यान, या चर्चांवर आता सुप्रिया सुळेंनी स्पष्टीकरण दिले आहे.
सुप्रिया सुळेंनी “मी आज महाराष्ट्राच्या मायबाप जनतेला दिवाळीच्या आणि पाडव्याच्या शुभेच्छा देते. सगळ्यांचं हे वर्ष सुख समृद्धीचं आणि आनंदाचं जावो अशी प्रार्थनाही करते. महाराष्ट्रावर महागाई, बेरोजगारी आणि दुष्काळाचं सावट आहे त्यातून आपली मुक्तता होऊ दे एवढीच पांडुरंगाचरणी प्रार्थना करते” असे म्हणत राज्यातल्या जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
पुढे सुप्रिया सुळेंनी अजित पवार यांच्या चर्चांवर बोलताना, “दादाला (अजित पवार) डेंग्यू झाला आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे. मागचे २० ते २५ दिवस दादा (अजित पवार) कुठल्याच कार्यक्रमांना गेलेला नाही. रणजीत पवार आहेत आणि इतरही भाऊ आहेत. मला असं वाटतं की जी गोष्ट आहे ती मोठ्या मनाने स्वीकारली पाहिजे. आहे त्या वास्तवात जगलं पाहिजे. अर्धा ग्लास कधीही रिकामा नसतो हे लक्षात ठेवलं पाहिजे.” असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
तसेच “माझ्यासाठी माझ्या कुटुंबातली प्रत्येक व्यक्ती महत्वाची आहे. प्रत्येक जण आपली तब्बेत, जबाबदाऱ्या सांभाळतो आहे. आज रोहितही इथे आलेला नाही. तो संघर्ष यात्रेसाठी बीडला आहे रोहितचा आम्हा सगळ्यांनाच सार्थ अभिमान आहे.” असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.