Ajit Pawar : दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने आणि दिवाळीच्या निमित्ताने बारामतीतल्या गोविंदबाग या ठिकाणी पवार कुटुंब दरवर्षी एकत्र येत असतात. यंदाही सर्व पवार कुटुंबीय एकत्र आले आहेत. शनिवारी शरद पवार आणि अजित पवार हे एकमेकांना दिवाळीच्या निमित्ताने भेटले. अशात गोविंदबाग या शरद पवारांच्या बारामतीतल्या निवासस्थानी शरद पवार आणि इतर पवार कुटुंबीय जमले आहेत मात्र अजित पवार अनुपस्थित असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे .
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यापासूनच शरद पवार आणि अजित पवार हे दिवाळीसाठी एकत्र येणार का? असा प्रश्न अनेकांना पडला होता. शनिवारी शरद पवार आणि अजित पवार हे एकमेकांना दिवाळीच्या निमित्ताने भेटले.त्यानंतर अजित पवार यांनी सरळ दिल्ली गाठून अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज गोविंदबाग या शरद पवारांच्या बारामतीतल्या निवासस्थानी शरद पवार आणि इतर पवार कुटुंबीय जमले आहेत मात्र अजित पवार आलेले नाहीत.त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान, अजित पवार यांच्या गैरहजेरीवर सुप्रिया सुळे यांनी पहिली प्रतिक्रिया देत “दादाला (अजित पवार) डेंग्यू झाला आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे. मागचे २० ते २५ दिवस दादा (अजित पवार) कुठल्याच कार्यक्रमांना गेलेला नाही. रणजीत पवार आहेत आणि इतरही भाऊ आहेत. मला असं वाटतं की जी गोष्ट आहे ती मोठ्या मनाने स्वीकारली पाहिजे. आहे त्या वास्तवात जगलं पाहिजे. अर्धा ग्लास कधीही रिकामा नसतो हे लक्षात ठेवलं पाहिजे.” असे म्हटले आहे.