अपघातांच्या पार्श्वभूमीवर दक्षता; गावी निघणाऱ्यांची संख्या वाढली
पुणे / लोणीकाळभोर – लॉकडाऊनचा कालावधी वाढणार असल्याने परप्रांतीयांनी पुणे शहर तसेच उपनगरांतील आपला मुक्काम हलविला आहे. शासकीय नियमांत न अडकता पायी किंवा मिळेल त्या वाहनाने गाव गाठण्याची त्यांची धडपड आहे. पोलिसांच्या तसेच महामार्गावरील गावांतील लोकांचा त्रास होऊ नये याकरिता काहीजण रेल्वे मार्गे पायी गावी जाण्याचा प्रयत्न करतात. अशात अपघाताच्या घटना समोर येऊ लागल्याने पुणे लोहमार्ग पोलीस तसेच असून रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) सतर्क झाले आहे.
रेल्वे मार्गावर आता पोलिसांची गस्त वाढविण्यात आली आहे. लॉकडाऊनचा टप्पा वाढविण्यात आल्याने पुणे सोडणाऱ्या परप्रांतीयांची संख्या वाढली आहे. यामुळे दक्षता म्हणून रेल्वेच्या पुणे विभागात विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना लोहमार्ग पोलीस अधीक्षक दीपक सकोरे यांनी केली आहे.
यानुसार पुणे लोहमार्ग पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सहा झोन करण्यात आले आहेत. यामध्ये पुणे स्टेशन ते लोणी काळभोर, पुणे स्टेशन ते सासवड, सासवड ते निरा, लोणावळा ते देहू रोड, देहू रोड ते खडकी, खडकी ते पुणे स्टेशन याचा समावेश आहे. या प्रत्येक विभागात पोलिसांची गस्त वाढविण्यात आली असून रेल्वे मार्गाचे ट्रॅकिंगही केले जात आहे. प्रवासी वाहतूक बंद असली; तरी मालगाड्या तसेच रूळांची दुरुस्ती यामुळे दक्षात घेतली जात आहे.
रेल्वे मार्गावरून जाणाऱ्या लोकांची माहिती ट्रॅकमन, गेटमन यांना रेल्वे प्रशासन, लोहमार्ग पोलीस तसेच आरपीएफला देण्यास सांगितले आहे. तसेच, पोलिसांसह सर्व यंत्रणांकडून गस्त घातली जात आहे.
– सुरेशसिंग गौड, वरिष्ठ निरीक्षक, लोहमार्ग पोलीस ठाणे