पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अग्निशामक विभागात नवीन नोकर भरती करण्यात येणार असून फायरमन रेस्क्यूअर पदाच्या १५० जागा भरण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. त्यासाठी अर्हता धारण करणा-या सुशिक्षित उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्यासाठी १७ मे ही अंतिम मुदत देण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवडमधील वाढत्या लोकसंख्येचा विचार करन पिंपरी-चिंचवड महापालिकेने अग्निशामक केंद्रांबरोबरच त्यासाठी लागणारे मनुष्यबळ वाढविण्यावर भर दिला आहे. अग्निशामक विभागात चतुर्थ श्रेणीतील फायरमन रेस्क्यूअर पदाच्या १५० जागा भरण्यात येत आहेत. त्यासाठीची प्रशासकीय प्रक्रिया महापालिकेने हाती घेतली असून इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नोकरभरतीबाबत १६ मार्च रोजी सविस्तर जाहीर प्रकटन देण्यात आले. त्यानुसार २६ एप्रिल रोजी ऑनलाईन अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. विहीत शैक्षणिक अर्हता धारण केलेल्या उमेदवारांना या पदासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्यासाठी १७ एप्रिल रोजी सायंकाळी सहापर्यंत मुदत देण्यात आली आहे.
फायरमन रेस्क्यूअर पदावर भरती झालेल्या उमेदवाराला दरमहा १९ हजार ९०० ते ६३ हजार २०० वेतनश्रेणी लागू आहे. त्यासाठी उमेदवार माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. त्यासोबतच राज्य शासनाचा राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्राचा सहा महिने अग्निशमन शिक्षण पाठ्यक्रम उत्तीर्ण केल्याचा दाखला आवश्यक आहे.
उंची १६५ सेंटीमीटर, छाती साधारणात ८१ सेंटीमीटर फुगवून ५ सेंटीमीटर, वजन ५० किलोग्रॅम, दृष्टी चांगली असणे अपेक्षित आहे. खुल्या प्रवर्गासाठी उमेदवाराचे वय ३० आणि मागासवर्गीय उमेदवारांचे ३३ पेक्षा अधिक नसावे, अशी अर्हता धारण करणारे उमेदवार अर्ज करु शकतात.