पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी चिंचवड सारख्या स्मार्ट सिटीतील महिलांची स्वच्छतागृहा अभावी कुचंबणा होत आहे. शहरात स्मार्ट टॉयलेट उभारले असले तरी पे अॅण्ड युज असल्याने सर्वसामान्य गरीब महिलांना हे परवडणारे नसल्याची भावना महिलांची आहे. या बाबत गांभिर्याने विचार होणे गरजेचे असल्याची मागणी महिलांची आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात निगडी ते दापोडीपर्यंत एकही मोफत स्वच्छतागृह नसल्याने महिलांची गैरसोय होत आहे. खरेदीसाठी आल्यावर शौचालयाची विचारणा केली जाते. मात्र स्वच्छतागृह असेलच असे नाही. असले तरी पे अॅण्ड युजच्या धोरणामुळे ते परवडत नसल्याचे महिला सांगत आहेत. पिंपरी चिंचवड शहरात महिला स्वच्छतागृहांची मागणी अनेक वर्षापासून करण्यात येत आहे.
महापालिकेने शहराच्या काही भागात, बाजारपेठा व इतर वर्दळीच्या ठिकाणी स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून स्वच्छतागृहे बांधली, मात्र, त्यांच्या देखभाल दुरुस्तीकडे लक्ष न दिल्याने त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. शहरात लोणावळा शहरापासून कामानिमित्त प्रवासी येत असतात. यामध्ये नोकरदार महिला आणि शिकणार्या विद्यार्थिनींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.
तसेच रस्त्यावर ड्युटी करणार्या वाहतूक पोलिस आणि वॉर्डन देखील आहेत. शहरात एसटी महामंडळाचे प्रवासी थांबे आहेत. लांब पल्ल्याच्या बसमधून प्रवास केल्यानंतर शहरात पाऊल टाकल्यावर स्वच्छतागृह नसल्याने त्यांची गैरसोय होते.
महापालिकेने स्मार्ट सिटी अंतर्गत मोठ्या दिमाखात शहरात भक्ती – शक्ती, धर्मराज चौक, जगताप डेअरी, बर्ड व्हॅली, सांगवी फाटा याठिकाणी स्मार्ट टॉयलेट बांधले आहेत. जे पे अॅण्ड युज आहेत. एकदा वापरासाठी महिलेला पाच रूपये द्यावे लागतात. या स्मार्ट टॉयलेट परिसरात एखादी महिला दिवसभर काम करत असेल तर दिवसभरात प्रत्येक वेळी पाच रुपये देणे परवडणार का? अशी प्रश्न महिला उपस्िथत करत आहेत.
ग्रामीण भागातून खरेदीसाठी पिंपरी-चिंचवड शहरात येत असतो. पुन्हा घरी जाण्यासाठी बस अथवा लोकल लवकर भेटत नाही. खूप उशीर झाल्यास स्वच्छतागृहाची सुविधा नाही. निगडी उड्डाणपूल येथे एकही मोफत स्वच्छतागृह नाही. त्यामुळे घरी जाईपर्यत काहीच पर्याय नसतो. – मानसी कदम, गृहिणी