रेडा -सध्या करोना व्हायरसच्या लॉकडाऊनमुळे आम जनता अडचणीत आहे. त्यामुळे शासनाच्या जनकल्याणकारी योजना जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचल्या पाहिजेत. यासंदर्भात भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शुक्रवारी (दि. 15) इंदापूरच्या तहसीलदार सोनाली मेटकरी यांच्याशी भाजप पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळासह चर्चा केली.
याप्रसंगी इंदापूर तालुका भाजपचे नानासाहेब शेंडे, नीरा-भीमा कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील, इंदापूर शहराध्यक्ष शकील सय्यद, माजी उपसभापती देवराज जाधव, महेंद्र रेडके, उपसभापती संजय देहाडे आदी पदाधिकारी उपस्थित होते. तालुका भाजपच्या वतीने मागण्यांचे निवेदन तहसीलदार सोनाली मेटकरी यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले.
यावेळी चर्चेत तालुक्यात ज्या गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे, येथे त्वरित टॅंकरने पाणीपुरवठा चालू करण्यात यावा. तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांचे पैसे तात्काळ त्यांच्या बॅंक खात्यामध्ये जमा करण्यात यावेत. मनरेगा अंतर्गत गावोगावी जनतेला रोजगार उपलब्ध करून देणेसाठी तातडीने कामे सुरू करण्यात यावीत.
लॉक डाऊनमुळे नागरिक अडचणी असल्याने सर्व कार्डधारकांना गहू, तांदूळ यांचा पुरवठा होईल याची दक्षता घेण्यात यावी. तालुक्यामध्ये बाहेरून येणाऱ्या लोकांची स्वॅब टेस्ट घेण्यासाठी इंदापूर, भिगवण, वालचंदनगर बावडा, सणसर, निमगाव केतकी येथे करोना टेस्ट लॅब चालू करण्यात याव्यात, आदी सूचना पाटील यांनी केल्या.