पिंपळे गुरव (वार्ताहर) – दापोडी-बोपोडी रस्त्यात असलेल्या ड्रेनेजलाइनच्या चेंबरचे झाकण तीन महिन्यांत तीनवेळा तुटले आहे. संबंधित ठेकेदाराने हे काम नक्की किती दर्जेदार केले आहे याविषयी नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे. निकृष्ट काम करणार्या ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. तुटलेल्या चेंबरमुळे वाहनचालकांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
महापालिकेच्या स्थापत्य विभागाच्या कामाबाबत नागरिकांमधून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. दापोडी-बोपोडी रस्त्यावर नेहमी नागरिक, वाहनचालक यांची वर्दळ असते. या रस्त्यावर अवजड आणि मोठ्या वाहनांची ये-जा सुरू असते. त्यामुळे, तेथे लोखंडी झाकणे बसवून दर्जेदार काम करावे, अशी स्थानिक रहिवाशांकडून वेळोवेळी मागणी केली जात आहे.
मात्र, केवळ दुरुस्तीचा दिखावा करून स्थापत्य विभागाकडून सिमेंटचे झाकण लावून मलमपट्टी करण्याचे काम करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी गटाराचे झाकण तिसर्यांदा तुटल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. लोखंडी झाकणाची आवश्यकता असतानाही स्थापत्य विभागाकडून बसविण्यात येत नसल्याने स्थापत्य विभागाला एखादा मोठा अपघात झाल्यास जाग येणार असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
चेंबरच्या झाकणाची दुरुस्ती केल्यावर काही वेळातच वाहनचालक या कामाभोवती लावलेले अडथळे बाजूला करून वाहने दामटतात. त्यामुळे झाकण तुटण्याचे प्रकार घडत आहेत. लोखंडी झाकण बसविण्यात येणार आहे. लोखंडी झाकणेही चोरीला जाण्याचे प्रकार घडले आहेत. – श्यामसुंदर भंडारी, अभियंता, स्थापत्य पिंपरी-चिंचवड महापालिका.